Blue Bottle Jellyfish: मुंबईकरांना सावध राहण्याचे आवाहन; जुहू बीचवर आढळले विषारी 'ब्लू बॉटल जेलीफिश'; जाणून घ्या डंख मारल्यास कशी घ्यावी काळजी
Bluebottle Jelyyfish at Juhu Beach (Photo Credits: Twitter/Shaunak Modi)

मुंबईच्या (Mumbai) जुहू येथील किनाऱ्यावर (Juhu Beach) गेल्या दोन-तीन दिवसांपासून ब्लू बॉटल जेलीफिश (Blue bottle Jellyfish) दिसत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत त्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना निर्बंधांमुळे, किनाऱ्यावर सकाळची वेळ सोडून इतर वेळी फिरण्याची परवानगी नाही. असे असूनही लोक किनाऱ्यावर फिरायला येत आहेत. म्हणून, रविवारी संध्याकाळपर्यंत, जुहू आणि वर्सोवाच्या बीचवर होर्डिंग्ज लावले असून, लोकांना जेलीफिशपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. या फिशना पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणूनही ओळखले जातात. हे मासे विषारी मात्र फसवे असतात.

दरवर्षी, हे मासे पावसाळी वाऱ्यांमुळे किनाऱ्यांवर पसरले जातात. मात्र ते किनारपट्टीवर वाळूमध्ये अडकतात आणि अखेरीस भरतीसह परत येतात. यातील बहुतेक समुद्रकिनाऱ्यावर मरतात. गेल्या चार दिवसात किनाऱ्यावर जास्त वारा वाहत होता, त्यामुळे जेली फिशची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे ते किनाऱ्यावर येत असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. (हेही वाचा: Monsoon Illness in Mumbai: पावसाळी आजारांनी मुंबईकर त्रस्त; मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस , गैस्ट्रोएन्टेरिटिस, डेंग्यूचे रुग्ण वाढले)

रविवारी सकाळी जेलीफिशच्या चाव्याने दोन नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. तेव्हापासून महापालिका आणि पोलीस सातत्याने लोकांना काठावर फिरू नका असे आवाहन करत आहेत.

याबाबत काय खबरदारी घ्यावी?

  • समुद्रकिनाऱ्यावरील सूचना फलकांकडे दुर्लक्ष करू नका. जर समुद्रकिनाऱ्यावर किंवा पाण्यात जाण्यास मनाई असेल तर त्या नियमांचे पालन करा. यासाठी शक्यतो बीचवर जाणे टाळा.
  • जर तुम्ही समुद्रकिनारी गेलात तर सँडल किंवा शूज घाला.
  • फोटो काढण्यासाठी अनेक लोक हातात जेलीफिश घेतात, असे करणे अधिक धोकादायक आहे.

याचा दंश झाल्यास, घाबरू नका. जेलीफिशच्या चाव्यामुळे सूज आणि लाल चट्टे येतात. जिथे फिशने चावा घेतला आहे तिथे समुद्राचे पाणी लावा. तो भाग खाजवू नका किंवा कोमट पाण्याने धुवू नका. आपण चावलेल्या भागावर बर्फ देखील लावू शकता. त्यानंतर पीडितेला रुग्णालयात नेले पाहिजे.

2018 मध्ये मुंबईच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात जेलीफिश सापडले होते. गिरगाव चौपाटी, जुहू आणि अक्सा बीच सारख्या लोकप्रिय किनाऱ्यांवर लहान मुलांसह 150 हून अधिक लोकांना जेलीफिश चावले होते.