Gopal Shetty (फोटो सौजन्य - फेसबुक)

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाडीतील अनेक मतदारसंघांत बंडखोरी उफाळून आली आहे. बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी संबंधित पक्षाचे नेते प्रयत्न करत आहेत. मुंबईत गोपाळ शेट्टी (BJP Rebel Gopal Shetty) आपला अर्ज मागे घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर विनोद तावडे यांच्या मुत्सद्दी प्रयत्नांना यश आले आहे. बोरिवलीतील गोपाळ शेट्टी आणि अंधेरीच्या स्वकृती शर्मा या दोघांनीही उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. गोपाळ शेट्टी यांनी सुरुवातीला बोरिवलीतून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. भाजपने त्यांना माघार घेण्याचे अनेक प्रयत्न केले. पक्षाने प्रयत्न करूनही शेट्टी निवडणूक लढवण्याच्या इराद्यावर ठाम राहिले. रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून शेट्टी यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मत बदलण्याचा प्रयत्न केला. आज तावडे यांनी शेट्टी यांची भेट घेतली. अखेर आज विनोद तावडे यांच्या प्रयत्नाला यश आले. (हेही वाचा -Assembly Elections 2024: बंडखोर पक्षादेश पाळणार? उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस)

दरम्यान, गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं आहे की, होय, मी माघार घेत आहे. मी आमदार होण्यासाठी लढत नाही. मला इतर पक्षांकडून ऑफर आली होती, पण मला त्या मार्गावर जायचे नव्हते. माझा लढा एका विशिष्ट तत्त्वावर होता. मी बोललो तर ते पक्षाच्या भल्यासाठी आहे. पण मला या वेळी माझी बाजू मांडावी लागली. पक्ष कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठा असून मी माझ्या समस्या नेतृत्वाला कळवल्या आहेत. (हेही वाचा -Mahim Vidhan Sabha: माहिमचा हलवा कोणाचा? उद्धव ठाकरे यांचा उमेदवार मैदानात; सदा सरवणकर आणि मनसे प्रमुखांच्या चिरंजीवांसमोर आव्हान)

गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं आहे की, मी आधीच सांगितले होते की मी दुसऱ्या पक्षात जाणार नाही. माझा मुद्दा काम करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीचा होता. भाजप आपल्या कार्यकर्त्यांची चांगली काळजी घेते, आणि नेतृत्वाने माझे ऐकले याचा मला आनंद आहे. त्यांच्यापर्यंत माझे म्हणणे पोहोचले आहे. म्हणूनच मी मागे हटत आहे.