सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोविड-19 ची लागण झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला
BJP leader Pankaja Munde and Maharashtra Minister Dhananjay Munde. (Photo Credit: PTI)

सध्या देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत असून आता  कोविड-19 (Covid-19) च्या कचाट्यात राज्यातील राजकीय नेते देखील अडकू लागले आहेत. महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Maharashtra Social Justice Minister Dhananjay Munde) यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Bridge Candy Hospital) उपचार सुरु आहेत. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) यांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. "काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा" असा संदेश पंकजा यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे. राजकारण बाजूला ठेवून कठीण काळात पंकजा मुंडे यांनी बहिणीच्या नात्याने धनंजय मुंडे यांना कोविड-19 वर मात करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (धनंजय मुंडे यांना Coronavirus ची लागण झाली असली तरीही प्रकृती स्थिर, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार होणार)

दरम्यान कोविड-19 ची लागण झाली असली तरी धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली होती. धनंजय मुंडेंसह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कोरोनाच्या विळख्यात अडकलेले धनंजय मुंडे हे राज्यातील तिसरे राजकीय नेते आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. मात्र त्यांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 101141 वर पोहचला असून एकूण 3717 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 49616 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 47796 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकड्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागणार अशा अफवा सर्वत्र पसरऱ्या होत्या. मात्र लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आले आहे.