Bhiwandi Building Collapse: भिवंडी येथील धोकादायक इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू; युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Bhiwandi Building Collapse (Photo Credits: Twitter)

भिवंडी (Bhiwandi) येथील शांती नगर परिसरात पिराणापाडा भागात आज (24 ऑगस्ट) दिवशी 4 मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये मातीच्या ढिगाखाली काही जण अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मातीच्या ढिगार्‍यातून 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर काही लोकांना जखमी अवस्थेमध्ये बाहेर काढण्यात आले आहे. जखमींवर नजिकच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

पिराणापाडा दुर्घटनेमध्ये सिराज अहमद अन्सारी आणि आखीब ही मृत झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. तर ढिगार्‍यात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इमारतीला तडे गेल्याचं नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर ही इमारत रिकामी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्या दरम्यानच ही दुर्दैवी घटना घडली आहे.

ANI Tweet 

काही दिवसांपुर्वी भिवंडीमध्ये गोदामाला लागलेल्या भीषण आगीमध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले होते. यंदा पावसाळ्यात इमारत दुर्घटनेचे अपघात सत्र वाढले आहे. मालाड, डोंगरी परिसरात मागील कही महिन्यात अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर मोडकळीस आलेल्या इमारती रिकामी करण्यासाठी नागरिकांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.