कोरेगाव भीमा हिंसाचार (Bhima Koregaon Violence) प्रकरणी सुरु असलेल्या चौकशी आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष होणार आहे. ही साक्ष येत्या 23 ते 24 फेब्रुवारी दरम्यान होणार होती. मात्र, काही कारणामुळे शरद पवार (Sharad Pawar) हे या दिवशी आयोगासमोर साक्ष देण्यास उपस्थित राहू शकणार नाहीत, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे.
नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, नजिकच्या काळात शरद पवार हे निश्चित रुपाने साक्ष देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने शरद पवार यांना 23 आणि 24 तारखेला साक्ष देण्यास हजर राहण्यास सांगितले होते. पुणे जिल्ह्यातील युद्ध स्मारकाजवळ जानेवारी 2018 मध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत पूरावे जमा करण्याच्या दृष्टीने आयोगाने शरद पवार यांना साक्ष नोंदविण्यास सांगितले. (हेही वाचा, Coronavirus: शरद पवार यांचा हा Video पाहिलात का? किल्लारी भूकंप 1993 घटनेवेळी केलेले अपत्ती व्यवस्थापन कौशल्य पाहून तुम्हालाही मिळेल प्रेरणा)
दरम्यान, 2020 मध्ये शरद पवार यांनी आयोगासमोर साक्ष नोंदविण्यासाठी बोलावले होते. मात्र, त्या काळात कोरोना व्हायरस महामारीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे ही साक्ष होऊ शकली नाही. मलिक यांनी म्हटले की, आयोगाने शरद पावर यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले. मात्र, त्यांनी आयोगाला लिखीत स्वरुपात सांगितले आहे की, या वेळी ते प्रत्यक्ष हजर राहू शकणार नाहीत.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2018 मध्ये कोरेगाव भीमाच्या 1818 च्या द्विशताब्दी वर्षानिमित्त युद्ध स्मारकाजवळ जातीय समूहांमध्ये हिंसाचार झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर 10 पोलीस कर्मचारी आणि काही लोक जखमी झाले होते. पुणे पोलिसांनी आरोप केला होता की 31 डिसेंबर 2017 रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत झालेल्या भडकावू भाषणांमुळे कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उफाळला. पोलिसांनी असाही आरोप केला होता की, एल्गार परिषदेच्या आयोजकांशी माओवाद्यांनीही संपर्क केला होता.