Bhandara Hospital Fire: राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची महाराष्ट्र सरकारला नोटीस; भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील 10 बाळांच्या मृत्यू प्रकरणी मागितला अहवाल
Fire at Bhandara District Hospital | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र सरकार कोरोनाशी दोन हात करत असताना, शनिवारी राज्यातील भंडारा (Bhandara) जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा (Infants) मृत्यू झाला होता. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरही या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली गेली होती. या घटनेमुळे विरोधी पक्ष आक्रमक होत असताना राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने (National Human Rights Commission) सोमवारच्या महाराष्ट्र सरकारला नोटिस बजावली आहे. एनएचआरसीने मुख्य सचिव आणि डीजीपी आणि महाराष्ट्र सरकारला यासंदर्भात चार आठवड्यांत सविस्तर अहवाल मागण्यासाठी ही नोटीस बजावली आहे. रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयाचा दौरा करत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.

आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री रुग्णालयाच्या सिक न्यूबॉर्न केअर युनिटला आग लागली. त्यावेळी या प्रभागात एक महिन्यापासून ते तीन महिन्यांपर्यंतच्या 17 नवजात मुलांना ठेवण्यात आले होते. प्रथम एका नर्सने ही आग पाहिली आणि तिने रुग्णालयात उपस्थित डॉक्टर आणि सुरक्षा कर्मचार्‍यांना माहिती दिली. त्यानंतर ताबडतोब आग विझविण्यास सुरुवात झाली.

यामध्ये केवळ सात बाळांना सुरक्षित बाहेर काढता आले. तीन बाळांचा आगीमुळे मृत्यू झाला तर सात ज श्वास गुदमरल्याने मरण पावले. सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाटे यांच्या म्हणण्यानुसार वॉर्डात अग्निशमन उपकरणे हजर होती. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा वापर करून आग विझविण्याचा प्रयत्नही केला. परंतु वॉर्डातील जास्त धुरामुळे गुदमरल्यामुळे बहुतेक अर्भकांचा मृत्यू झाला. (हेही वाचा: भंडारा जिल्हा रुग्णालय दुर्घटनेप्रकरणी पीडित कुटुंबांना पंतप्रधान निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर)

दरम्यान, बाळं गमावलेल्या मातांच्या सांत्वनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत आले होते. अशा भीषण दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रच जणू आपल्या पाठीशी असल्याचा दिलासा मातांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेटून दिला.