महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट हटावे म्हणून भगवान महाराजांचे 127 किमीचे लोटांगण (Video)
भगवान महाराज लोटांगण (संग्रहित-संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे. विदर्भ, मराठवाड्यात तर विहिरींवर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. काही ठिकाणी दोन घागरी पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागत आहे. अशात महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन उशिरा होणार आहे. दुष्काळाचे सावट हटावे यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे, यामध्ये आपला खारीचा वाटा म्हणून भगवान महाराज तब्बल 127 किलोमीटचे लोटांगण घालत आहेत. बीड तालुक्यातील तांदळवाडी येथील तपोभूमी संस्थान ते परळीचे श्री वैद्यनाथ मंदिर यादरम्यान महाराज लोटांगण घालत आहेत. दै. पुढारीने याबाबत वृत्त दिले आहे.

सध्या बीड जिल्ह्यात फक्त 0.72 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हजारो विहिरी, धरणे आटल्या आहेत त्यामुळे लवकरच 1972 सारखी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. महाराष्ट्रावरील हे संकट दूर व्हावे म्हणून, तांदळवाडी तपोभूमी महादेव मंदिर संस्थान येथील मठाधिपती भगवान महाराज यांनी 4 ते 22 मे दरम्यान लोटांगण घालण्याचा संकल्प सोडला आहे.

(हेही वाचा: नगर जिल्ह्यात 124 गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा, दापोली तालुक्यात 34 जणांना रोगाची लागण)

परळीचा वैद्यनाथ मोठे जागृस्त देवस्थान, शंकराच्या कृपेने हा दुष्काळ संपावा म्हणून 127 किलोमीटरचे हे लोटांगण आहे. यामध्ये त्यांचा 21 ठिकाणी मुक्काम होणार आहेत. तांदळवाडी ग्रामस्थही या संकल्पामध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. ग्रामस्थ रस्त्यावर गाड्या टाकून भगवान महाराजांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.