विनातिकीट फिरणाऱ्या प्रवाशांमुळे BEST ला 132 कोटींचा फटका; जाणून घ्या 2018-19 ची आकडेवारी
BEST Bus (Photo Credits: PTI)

विनातिकीट प्रवास करणाऱ्या मंडळीत मागील वर्षात म्हणजेच 2018-19 मध्ये झालेल्या वाढीने बेस्ट (BEST) मंडळाला तब्बल 132 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्यानुसार आकडेवारी पाहायला गेल्यास दरमहा 11 कोटी रुपयांचे मोठे नुकसान बेस्टला सहन करावे लागत असल्याचे समोर येत आहे. याबाबत भाजपाचे (BJP)  नेते सुनील गणचर्या (Sunil Gancharya) यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत, विनातिकीट प्रवास वाढल्यामागे प्रवाशांसोबत यामध्ये इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनचा (Electronic Ticket Machine) देखील दोष आहे. अनेकदा या मशिन्स बंद किंवा बिघडलेल्या अवस्थेत असल्याने प्रवाशांना विनातिकीट प्रवास (Ticketless Travel) करण्याची मुभा मिळते मात्र याचा परिणामा बेस्टच्या महसूलावर होत आहे.

बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, हा तोटा खूपच मोठा आहे, मात्र बेस्टच्या महसुलात होणारी कपात ही विनातिकीट प्रवासामुळे होत आहे हे म्हणणे उचित ठरणार नाही. याउलट प्रवाशांची संख्या कमी झाल्याने एकूण मिळकतीवर वाईट परिणाम झाल्याचे समजत आहे. बेस्ट प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! बस तिकिटांचे दर झाले कमी, वातानुकूलित बसचे कमीत कमी भाडे झाले 6 रुपये

वास्तविक बेस्ट मंडळाने जेव्हापासून बसचे किमान भाडे हे पाच रुपये इतके केले आहे तेव्हापासून बसच्या प्रवाशांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे पण दुसरीकडे जरी प्रवासी वाढत असले तरी बसभाड्याची रक्क्म कमी झाल्याने बेस्टची मिळकत वाढलेली दिसून येत नाहीये. अशातच ऑक्टोबर मध्ये बेस्टने केलेल्या घोषणेनुसार, 2021 पर्यंत बसभाड्यात कोणतीही वाढ करण्यात येणार नाही, यामुळेच 2020-21 पर्यंत बेस्टला तब्बल 2,250 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.