BEST Strike: मागील चार दिवसांपासून बेस्ट संपामुळे (BEST Strike) सामान्य मुंबईकरांची होणारी परवड पाचव्या दिवशी म्हणजे शनिवारीदेखील होण्याची शक्यता आहे. आज उच्च न्यायालयाच्या ( Bombay High Court) हस्तक्षेपानंतर बंद मागे घेतला जाईल अशी अपेक्षा होती मात्र तसे होऊ शकलेले नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये मुख्य सचिव, परिवहन विभाग आणि नगरविकास खात्याचे सचिव या तिघांचा समावेश आहे.
वेतनवाढीसह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर गेले होते. दरम्यानच्या काळात बेस्ट कृती समिती, अजॉय मेहता आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये महापौर बंगल्यावर बैठका झाल्या. 3-4 वेळेस बोलणी फिस्कटल्याने अखेर न्यायालयात हे प्रकरण गेले. बेस्ट कर्मचार्यांच्या कुटुंबियांनी राज ठाकरेंची भेट घेऊन आपली बाजू मांडली. त्यावेळेस एकजूट ठेवा असा सबुरीचा सल्ला राज ठाकरेंनी बेस्ट कर्मचार्यांसोबत त्यांच्या कुटुंबियंना दिला.
राज्य सरकारने संपकरी बेस्ट कर्मचार्यांच्या विरोधात ‘मेस्मा’ लागू केल्यानंतरही संप मागे घेण्यात आला नाही. या संपाविरोधात वकील दत्ता माने यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी झाली. बेस्ट व राज्य सरकारने संप बेकायदा असल्याचे हायकोर्टात सांगितले. मात्र संप करण्यापूर्वी नोटीस दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या पहिल्या बैठकीतदेखील कोणताच तोडगा न निघाल्याने आज संध्याकाळीदेखील चाकरमान्यांची परवड होणार आहे.