Torrential Rains | (Photo Credit -Annasaheb Chavare)

पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati Flood) आणि इंदापूर (Indapur Flood) तालुक्यांमध्ये रविवारी दिवसभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती (Baramati Flood Alert) निर्माण झाली. या आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या दोन विशेष पथकांची तातडीने तैनाती करण्यात आली आहे. संततधार पावसामुळे नीरा धरणाचा डावा कालवा फुटला. ज्यामुळे रस्ते आणि महामार्गांवर पाणी साचले, अनेक इमारती खचल्या, वहतुककोंडी झाली. (Torrential Rains) पुरसदृश्य स्थिती निर्माण झालेल्या भागात जनजीवन विस्कळीत झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले की, या भागात पाठिमागील 40 वर्षांचा इतिहास मोडीत काढत विक्रमी पाऊस झाला. या भागातील खासदार सुप्रिया सुळे यांनी पूरसदृश्य आणि मुसळधार पावसाने प्रभावीत झालेल्या प्रदेशातील शालेय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली.

बारामतीत 83.6 मिमी, इंदापूरमध्ये 35.7 मिमी पावसाची नोंद

बारामती तालुक्यात दिवसभरात 83.6 मिमी पावसाची नोंद झाली, तर इंदापूरमध्ये 35.7 मिमी पावसाचा आकडा नोंदवण्यात आला. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक ठप्प

पुणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूरजवळ पुणे-सोलापूर महामार्गावरील एक भाग सुमारे दोन तास पाण्याखाली गेला होता. मात्र, नंतर पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

70 गावांमध्ये घरात पाणी, नागरिकांचे स्थलांतर

इंदापूर तालुक्यातील सुमारे 70 गावांमध्ये आणि बारामतीत 150 पेक्षा अधिक घरांमध्ये पाणी घुसले. स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू करत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. बारामतीत 19 घरांचे अंशतः नुकसान झाल्याची नोंद आहे.

स्थानिकांनी व यंत्रणांनी मिळून वाचवले जीव

कटेवाडी येथे एका सात जणांच्या कुटुंबाला घरात पाणी शिरल्यानंतर स्थानिक नागरिक आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जालोची गावात रूपेश सिंह यांची मोटरसायकल ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर ते अडकले होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले.

पाण्याच्या कालव्यातून भगदाड, नदीपात्रात वाढ – NDRF

NDRF च्या अधिकृत पत्रकात सांगण्यात आले की, कालव्यांमध्ये भगदाड पडल्याने अनेक खालच्या भागात गंभीर पूरसदृश स्थिती निर्माण झाली. बारामतीतील कारा नदी आणि इंदापूरमधील नीरा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. प्रारंभी बारामतीत सात तर इंदापूरमध्ये दोन नागरिक अडकल्याची माहिती होती. दरम्यान, नीरा धरणाचा डावा कालवादेखील फुटला.

विशेष बचाव पथकांची तातडीने तैनाती

NDRF चे दोन्ही पथक मुख्यालयातून संध्याकाळी रवाना करण्यात आले. या पथकांमध्ये प्रशिक्षित गोताखोर, जलप्रलय बचाव (FWR) साधने, वैद्यकीय मदत साहित्य (MFR) यांचा समावेश होता. सर्व अडकलेल्या नागरिकांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.

परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची अडचण – सुप्रिया सुळे

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया (X) वरून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्याच्या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली. 'गेल्या तीन-चार दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश स्थिती आहे. उद्या होणाऱ्या अभियांत्रिकी आणि इतर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रांपर्यंत पोहोचणे कठीण होईल. विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा पुढे ढकलाव्यात,' असे त्यांनी म्हटले.

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

सार्वजनिक वाहतूक आणि दळणवळण ठप्प

बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यांमध्ये सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रवाशांचे हाल झाले असून प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. रस्ते, ओढे, आणि नाले पाण्याखाली गेले आहेत.

MIDC परिसरातील तीन इमारती अंशतः कोसळल्या

बारामतीतील MIDC परिसरात तीन इमारती – साईरंग, ऋषिकेश आणि श्री समर्थ – या पाण्याच्या अतिप्रवाहामुळे आणि भिंतींच्या कमकुवत झाल्यामुळे अंशतः कोसळल्या. या ठिकाणी रहिवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. अनेक कुटुंबीय आता रस्त्यावर किंवा इतर सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती आणि इंदापूरमधील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देत तातडीच्या बचाव व मदतकार्यांसाठी तयारीत राहण्याचे निर्देश दिले आहेत.