ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष  बाळासाहेब थोरात यांची मागणी
EVM Machine (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी 21 ऑक्टोबर दिवशी निवडणूक मतदान पार पडले. या निवडणूकीच्या मतदानामध्येही मतदानासाठी ईव्हीएमचा वापर करून मतदान करण्यात आलं आहे. यादरम्यान ईव्हीएम सोबत छेडछाड झाल्याचा आरोप करत कॉंग्रेसने पुन्हा निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. 'ईव्हीएम मशीन टँपरींग होऊ शकते अशी जनभावना असल्याने ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत' अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र लिहून केली आहे. सोबतच कॉंग्रेसने प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी व त्यानंतरच पुढच्या फेरीची मोजणी करावी. व्हीहीपॅटच्या मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी. असे देखील म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: काँग्रेस कडून निवडणूक आयोगाकडे राज्यात EVM मशीन बिघडल्याच्या 65 तक्रारी दाखल.

कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या पत्रामध्ये बाळासाहेब थोरात यांनी कोणत्याही मतदान यंत्राबाबात शंका निर्माण झाल्यास त्या मतदान यंत्रातील मतांची मोजणी सलग 4 वेळा करण्यात यावी, आणि 50 टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशा मागण्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या पत्राद्वारे केल्या आहेत. राज्यात 288 विधानसभा जागांवर घेण्यात आलेल्या मतदानाचा निकाल 24 ऑक्टोबर दिवशी जाहीर केला जाणार आहे. त्यासाठी राज्यात चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या एक्झिट पोल अंदाजानुसार पुन्हा शिवसेना - भाजपाचं सरकार सत्ता स्थापन करण्याची शक्यता दाट आहे.

ANI Tweet 

लोकसभेप्रमाणे विधानसभेमध्ये देखील कॉंग्रेस - राष्ट्रवादी पक्ष फारशी उत्तम कामगिरी करू शकणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता विधानसभेचा निकाल काय लागणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.