भाजपा आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून 22 जानेवारी दिवशी अयोद्धेच्या राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. राज्यातील जनतेला अयोद्धेमधील राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे क्षण पाहता यावेत त्यासाठी सुट्टी जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. ही सुट्टी शासकीय आणि खाजगी आस्थापनांसाठी असावी अशी त्यांनी मागणी केली आहे. अतुल भातखळकर हे भाजपाचे कंदिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
22 जानेवारी दिवशी राम मंदिरामध्ये दुपारी 12 वाजून 20 मिनिटांच्या मुहूर्तावर रामलल्लांची मूर्ती गर्भगृहात प्रतिष्ठापित केली जाईल अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे जनरल सेक्रेटरी चंपत राय यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे. त्यामुळे आता जसा हा दिवस जवळ येत आहे तशी रामभक्तांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
२२ जानेवारीला,
होऊ दे दिवाळी….🚩🚩🚩🚩 pic.twitter.com/qMyCUw3H49
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 1, 2024
अयोध्येत श्रीरामांची २२ जानेवारी रोजी प्रतिष्ठापना होते आहे, या दिवशी लोकांना उत्सव साजरा करता यावा यासाठी सुट्टी जाहीर करा, अशी विनंती मी मुख्यमंत्री मा.@mieknathshinde यांना केलेली आहे. pic.twitter.com/2Fd6T1L7y7
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 1, 2024
22 जानेवारी दिवशी रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठीत करण्याचा विधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. 16 जानेवारीपासून या मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी विविध पूजा विधींना सुरूवात होणार आहे.
सुट्टी जाहीर करण्याची मागणी यापूर्वीही भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून केली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून 22 जानेवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. तर राम कदम यांनी अयोध्येमध्ये 500 वर्षांनंतर राममूर्तीची प्रतिष्ठापना होत असून हा दिवस महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात दिवाळी साजरा करण्यासारखा आहे. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात दारू आणि मांस बंदी करावी, अशी मागणी केली आहे.