Maharashtra CM Uddhav Thackeray addressing the press | (Photo Credits: ANI)

गेल्या काही महिन्यांपासून औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नाव बदलून संभाजीनगर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र अजूनही त्याबाबत काही निर्णय झाला नाही. अशात आता राज्य सरकारने मोठा निणर्य घेत, औरंगाबाद विमानतळाचे (Aurangabad Airport)  नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ (Chhatrapati Sambhaji Maharaj Airport) असे केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddav Thackeray) यांनी आज विधानसभेत, औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे अनेकांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

ही गोष्ट तमाम महाराष्ट्राच्या जनतेसाठी अभिमानास्पद गोष्ट असून, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा हा गौरव आहे असे मत व्यक्त करण्यात येत आहे. औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलावे यासाठी, लोकप्रतिनिधी, अनेक पक्ष संघटना यांच्याकडून सातत्याने मागणी होत होती. आज सीएम उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील 'धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ' असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे.

त्यानंतर आता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याआधी 2011 व मार्च 2019 मध्येही औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलण्याची मागणी जोर धरत होती, मात्र त्यावेळी तो निणर्य झाला नाही. मात्र आज ठाकरे सरकारने हा मोठा निणर्य घेतला आहे. दुसरीकडे आशिष शेलार यांनी विमानतळाचे नाव बदलणे ही पळवाट असल्याचे मत व्यक्त केले आहे. शहराचे नाव बदलले तर महाविकास आघाडीमधील इतर पक्ष नाराज होतील, म्हणून विमानतळाचे नाव बदलले अशी टीका त्यांनी केली आहे. (हेही वाचा: Sarkari Naukri: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया)

दरम्यान याआधी, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे. तसेच  कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर असे करण्यात आले आहे.