
आषाढी एकादशी साठी सध्या वारकर्यांचा प्रवास पंढरपूर च्या दिशेने सुरू झाला आहे. ज्ञानोबांच्या पालखीनंतर आता संत तुकोबा रायांच्या पालखीचेतील पादुकांचेही नीरा स्नान संपन्न झाले आहे. पण या सोहळ्यानंतर आनंदाला गालबोट लागलं आहे. वारी मध्ये सहभागी 21 वर्षीय वारकरी तरूण नीरा नदी मध्ये बुडाला आहे. गोविंद कल्याण फोके असं या तरूणाचं नाव असून तो जालन्याच्या अंबड तालुक्यातील झिरपी गावचा होता. आजीसोबत तो वारी मध्ये आला होता. दरम्यान गोविंदचा मृतदेह न सापडल्याने संतप्त वारकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे.
गोविंद आणि त्याची आजी प्रयागबाई प्रभाकर कराबे यांच्यासोबत पहिल्यांदाच वारी मध्ये आला होता. गोविंद हा प्रयागबाईंची मुलगी नर्मदा कल्याण फोके यांचा एकुलता एक मुलगा होता. नातू गेल्यानंतर त्या आजीने हंबरडा फोडला.
गोविंद उत्साही मुलगा होता. संत तुकोबांच्या पालखीत तो रोज भजन-कीर्तनात उत्साहाने भाग घ्यायचा आणि रात्री उशिरापर्यंत सर्वांसमोर नाचायचा. अकलूज जवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे स्नान करताना नदीच्या भोवऱ्यात सापडून त्याचा मृत्यू झाला. नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या नातवाकडे पाहून आजीच्या काळजाचे पाणी झाले. नक्की वाचा: Pandharpur Wari 2025 Sant Tukaram Maharaj Palkhi Time Table: संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा कसा असेल? पहा रिंगण सोहळा, मुक्कामांचा संपूर्ण कार्यक्रम .
दरम्यान संतप्त वारकर्यांच्या आक्रोशासमोर पोलिस अधिकारी आले आणि त्यांनी गोंविदचा मृतदेह शोधण्याचे आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेतलं.