Appasaheb Dharmadhikari | Twitter

महाराष्ट्र राज्य सरकार कडून दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण' (Maharashtra Bhushan 2023) यंदा समाजसुधारक अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना दिला जाणार आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) च्या खारघर (Kharghar) मध्ये हा पुरस्कार प्रदान सोहळा रंगणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते अप्पासाहेबांना हा मानाचा पुरस्कार दिला जाणार आहे. नवी मुंबईमधिल सेंट्रल पार्क परिसरात होणार्‍या या सोहळ्याला त्यांचे लाखो अनुयायी उपस्थिती लावणार आहेत. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत.

अप्पासाहेब धर्माधिकारी हे निरूपणकार आहेत. वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांना हा वारसा लाभला आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून विविध ठिकाणी बाल संस्कारवर्ग, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती, परिसर स्वच्छता, वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन, विहिरी पुनर्भरण, शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम राबवले जातात. हवामानातील बदल आणि त्याचे तापमानावर होणारे परिणाम लक्षात घेता वृक्षलागवड करून त्यांची जोपासना करण्याचे काम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. त्यांच्या प्रतिष्ठानकडून 2015 ते 2021 या कालावधीत एकूण 36 लाख 61 हजार 611 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. नक्की वाचा: Maharashtra Bhushan Award: नवी मुंबई येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आयोजन; कार्यक्रमानिमित्त 15 व 16 एप्रिल रोजी वाहतुकीत बदल, घ्या जाणून .

अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत डी. वाय. पाटील विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी त्यांना प्रदान केली आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना राज्याचे स्वच्छता दूत म्हणून निवडले होते. तर 2017 मध्ये त्यांना पद्मश्री हा मानाचा नागरी सन्मान देऊन गौरव केला आहे. युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्युटने अप्पासाहेबांना लिव्हिंग लिजंड पुरस्कार देऊनही सन्मानित केले आहे.

जानेवारी, 2023 च्या निकषानुसार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्याला ₹ २५ लाख रोख, शाल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाते. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनाही महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यामुळे बाप-लेकांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरवले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.