माजी मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांना आणखी एक धक्का; मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील 11 शिवसेना नगरसेवक एकनाथ शिंदे गटामध्ये सामील
Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून आणखी एक धक्का बसला आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील (MBMC) स्थानिक आमदार-प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 11 शिवसेना नगरसेवक गुरुवारी एकनाथ शिंदे गटामध्ये सामील झाले. मात्र, सरनाईक यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून 18 नगरसेवक शिंदे कॅम्पमध्ये सामील झाल्याचा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते धनेश पाटील यांच्यासह नगरसेवकांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाण्याचे पालकमंत्री असलेले शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला लागून असलेल्या मीरा भायंदरच्या प्रगतीसाठी एकत्र काम करण्याचे आश्वासन दिले.

या ठिकाणी 22 निवडून आलेले प्रतिनिधी आणि एक नामनिर्देशित सदस्यांसह, शिवसेना 95 सदस्यीय नागरी मंडळात प्रमुख विरोधी पक्ष आहे, जिथे भाजपची एकहाती सत्ता आहे. गेल्या वर्षी एका नगरसेवकाचे निधन झाले, तर आणखी दोन जणांनी उघडपणे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे सेनेचे संख्याबळ 19 वर आले आहे. मीरा भायंदर नगरपालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपत असून या वर्षाच्या शेवटी निवडणुका होणार आहेत.

अशाप्रकारे, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेतील शिवसेनेचे बहुतांश माजी नगरसेवक शिंदेगटात दाखल झाल्यानंतर आता अजून एका महानगरपालिकेत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणचे आणखी नगरसेवक आणि पदाधिकारी असेच पाउल उचलण्याचा विचार करत आहेत, ज्यामुळे आगामी नागरी निवडणुकीत पक्षासाठी गंभीर अडथळे निर्माण होऊ शकतात. (हेही वाचा: पेट्रोल-डिझेल दरावरुन अजित पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, ‘दोघंच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झालेत’)

दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह देशात आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तींना पूर्वीप्रमाणेच मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.