अण्णा हजारेंचा पुन्हा उपोषणाचा इशारा; लोकपाल नियुक्तीविरुद्ध 30 जानेवारी पासून उपोषण
Anna Hazare (Photo Credits: IANS)

सामाजिक कार्यकर्ते आणि भ्रष्टाचार विरोधी लढणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पुन्हा  उपोषणाचा इशारा दिला आहे. 30 जानेवारी 2019 पासून राळेगळ सिद्धी येथे ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत. लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी हे उपोषण पुकारण्यात येणार आहे. यापूर्वी अण्णा हजारेंनी लोकपाल विधेयकाच्या मागण्यांसाठी 2011 मध्ये दिल्लीतील रामलीला मैदानात उपोषण केले होते.

महात्मा गांधीच्या 70 व्या पुण्यतिथीच्या दिवशी अण्णा हजारे उपोषणाला सुरुवात करणार आहेत. लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीचे सरकार वारंवार आश्वासन देवूनही नियुक्ती करत नसल्याने अण्णा हजारेंनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

राज्यात लोकपाल आणि केंद्रात लोकायुक्तांची नियुक्ती न करण्याची अनेक कारणे देत असल्याचा आरोप अण्णांनी पंतप्रधान कार्यालयातील पीएमओ जितेंद्र सिंग यांच्यावर केला आहे.

लोकपाल आणि लोकायुक्तांचा कायदा 2013 मध्ये पास करण्यात आला. त्यानंतर भ्रष्टाचार रोखण्यासाठी देशात लोकपाल आणि लोकायुक्तांची नियुक्ती व्हावी, अशी जनतेची आशा होती. मात्र त्यानंतर केंद्रात सत्तांतर झाले आणि मोदी सरकारच्या हाती कारभार गेला. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर 30 वेळा लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी सरकारला पत्र लिहिण्यात आले. मात्र त्यावर मोदी सरकारकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर आलेले नाही.