Anganwadi Workers' Strike Called Off (संग्रहित संपादित प्रतिमा)

Anganwadi Workers' Strike Called Off: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस (Anganwadi Workers) यांच्या विविध मागण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून संप सुरू होता. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध संघटनेचे शिष्टमंडळ आणि प्रतिनिधी यांच्या सोबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Minister Aditi Tatkare) यांनी वारंवार अनेक बैठका घेऊन यावर तोडगा काढला. अंगणवाडी सेविकांचा संप मिटविण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या शिष्टाईला अखेर यश आले.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,महिला व बालविकास सचिव,अनुपकुमार, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासोबत वारंवार झालेल्या बैठकीत समाधानकारक आणि आशादायी चर्चा झाली. त्यामुळे आम्ही संप मागे घेत असल्याचे सर्व संघटनांनी जाहीर केले.

दरम्यान झालेल्या बैठकीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पेन्शन लागू करण्याकरिता संघटनांकडून अभिप्राय घ्यावेत. सदर अभिप्राय व बँकांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव यांचा एकत्रित अभ्यास करून एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त यांनी तातडीने प्रस्ताव सादर करून वित्त व नियोजन विभागाकडे पाठवावा. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी देण्याबाबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्याकडून प्राप्त प्रस्तावावर विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन वित्त व नियोजन विभागाकडे पाठविण्यात यावा, असे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले. (हेही वाचा: Mumbai Coastal Road Project: मुंबईकरांना दिलासा! कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा फेब्रुवारीच्या सुरुवातीला पूर्ण होणार)

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्री तटकरे यांनी संप सुरू असल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागाचे सचिव, आयुक्त, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध संघटनासोबत वारंवार बैठका घेऊन यावर सकारात्मक चर्चा करून संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला साद देत संपात सहभागी आसलेल्या सर्व संघटनांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्याबद्दल मंत्री तटकरे यांनी सर्वांचे आभार मानले.