Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil: अमोल कोल्हेकडून थेट पुरावेच सादर करत आढळराव पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

शिरुर लोकसभेचे (Shirur Loksabha) उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्यात आता आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या या सुरु झाल्या आहेत.  आढळराव पाटील यांनी संसदेत त्यांच्या कंपनीच्या हितासाठी संरक्षण खात्याविषयीच प्रश्न विचारले होते, असा आरोप केला होता. या आरोपानंतर आता अमोल कोल्हे यांनी थेट पुरावेच सादर करत आढळराव पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हा फक्त चित्रपटाचा ट्रेलर असल्याचे सांगत पिक्चर अभी बाकी है असा इशारा देखील अमोल कोल्हे यांनी दिला आहे.  (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: लोकककलाकार नंदेश उमप उतरले निवडणुकीच्या रिंगणात)

"मी पंधरा वर्षे लोकसभेत सदस्य म्हणून काम करत असताना लोकसभेची आचार संहिता काटेकोरपणे पाळली आहे. मी माझ्या व्यवसायाशी संबंधित एकही प्रश्न गेल्या पंधरा वर्षात लोकसभेत विचारला नाही, " असा दावा शिरूर लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांनी केलेल्या आरोपावर केला आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आव्हानानंतर लोकसभेत 7 एप्रिल 2017 आणि 13 फेब्रुवारी 2019 रोजी मांडलेल्या प्रश्नांची कागदपत्रे अमोल कोल्हे यांनी दाखवली आहेत. आढळरावांनी त्यांच्या कंपनीचं हित जोपासण्यासाठी लोकसभेत हा खटाटोप का केला? असा सवाल उपस्थित करत याचं उत्तर त्यांनी जनतेला द्यावं, शिवाय मी पुरावे दिल्यावर लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडणार, हा दिलेला शब्द आता आढळरावांनी पूर्ण करावा, असे प्रती आव्हानही अमोल कोल्हेंनी दिले आहे.