Coronavirus Outbreak: धारावीला पूर्णतः लॉकडाऊन करण्याची खासदार राहुल शेवाळे यांची मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुचवल्या 'या' उपाययोजना
Rahul Shewale | PHoto Credits: Facebook

आशियामधील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीमध्ये दिवसागणिक वाढणार्‍या कोरोनाग्रस्तांमुळे आता शिवसेना खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धारावी मध्ये संचारबंदीचे नियम कडक करत पूर्णतः लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे. याबाबतचं पत्र देखील राहुल शेवाळेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. दरम्यान आज (8 एप्रिल) धारावीमध्ये दोन नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने या परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा 9 वर पोहचला आहे. दरम्यान काल स्थानिक आमदार वर्षा गायकवाड, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धारावीमध्ये येऊन पोलिसांशी सल्लामसलत करून परिस्थितीचा आढावा देखील घेतला आहे. Coronavirus: धारावी परिसरात 2 नव्या रुग्णांसह COVID 19 बाधितांची संख्या 9.

खासदार राहुल शेवाळे यांनी धारावी संपूर्णपणे लॉकडाऊन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही उपाययोजना देखील सुचवल्या आहेत. यामध्ये त्यांनी धारावीमधील सारी रूग्णालयं महापालिकेने ताब्यात घ्यावीत, धारावी स्पोर्ट्स कॉम्पेल्स क्वारंटीन वॉर्डमध्ये बदलावं, धारावीत युद्धपातळीवरनिर्जुंतुकीकरण करावं, टेस्टिंग किट्स धारावीमध्ये पुरवावीत, नागरिक पोलिसांना दाद देत नसल्याने राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करावी, शिधावाटपाची वेगळी सोय करून होम किचन सुरू करावं यामुळे नागरिकांना अन्नाची चणचण भासणार नाही.

राहुल शेवाळे ट्वीट

धारावीमध्ये आढळलेल्याअ पहिल्या कोरोनाबाधिताच्या घरी दिल्ली मरकजच्या कार्यक्रमात सहभागी 10 जण रहायला आले होते. त्यामुळे या कुटुंबात कोरोना व्हायरस पसरला. सोबत वरळीमधील एक पालिका कर्मचारी धारावीत साफसफाईचं काम करत होता. त्यालाही कोरोनाची लागण झाली. एक डॉक्टरदेखील धारावीत कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. धारावी झोपडपट्टीमध्ये सोशल डिस्टंन्सिंग पाळणं हे कठीण असल्याने आता कोरोना व्हायरस हातपाय पसरवण्यापूर्वी त्याला रोखायला हवं अशी आग्रही भूमिका राहुल शेवाळेंनी मांडली आहे.