
अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात कालपासून शिवसेना नेते श्यामा पहलवान (Shyama Pahalwan) नंदवंशी यांच्यासह 3 लोकांच्या हत्येमुळे सार्या परिसरात खळबळ माजली आहे. या हत्याकांडामुळे अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी संताप व्यक्त केल्याने सुरक्षेच्या कारणास्तव अमरावती जिल्ह्यामध्ये कर्फ्यु लावण्यात आला आहे. परातवाडा (Paratwada) परिसरात काल दुपारी 12.30 च्या सुमारास श्यामा पहलवान नंदवंशी यांची हत्या झाली. त्यांच्यावर गंभीर चाकूहल्ला करण्यात आला. यानंतर त्यांच्या समर्थकांनी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी याकरिता मागणी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक युवकाशी काही दिवसांपूर्वी वाद झाला. श्यामा यांच्यावर या पूर्ववैमन्यस्यामधूनच हल्ला करण्यात आला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
श्यामा यांचा जेव्हा स्थानिक तरूणाशी वाद झाला तेव्हा तो सोडवण्यसाठी त्यांचे काही समर्थकदेखील भांडणात सहभागी होते. दुर्रानी आणि लक्कड बाजार अशा दोन विविध ठिकाणी श्यामा यांच्या समर्थकांवर हल्ला करण्यात आला. जखमी अवस्थेमध्ये त्यांना नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
काही तासांतच अमरावतीमध्ये 3जणांची हत्या झाल्याने सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे. सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान काही तुरळक ठिकाणी दगडफेक झाली आहे. तर पोलिसांनी 6 संशयितांना अटक झाली आहे.