Mumbai Air Pollution: मुंबईत वायू प्रदूषणाने कहर केला आहे. शहरात दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता (Air Quality) ढासळत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर बीएमसीने शहरातील 2,900 बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या साइट्सना सूचना नोटिसा बजावल्या आहेत. वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सुमारे 278 स्टॉप-वर्क नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या नोटिसांमध्ये कोस्टल रोड आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या विविध पायाभूत सुविधा विकासकांना तसेच संपूर्ण शहरातील रेडी मिक्स कॉंक्रिट (RMC) प्लांटना लक्ष्य केले आहे.
बीएमसीने बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या ठिकाणांची तपासणी करण्यासाठी प्रभाग स्तरावर विशेष पथके स्थापन केली आहेत, ज्यांनी बीएमसीच्या धूळ कमी करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात अयशस्वी झालेल्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. शहरातील 6,000 हून अधिक बांधकाम साइट्ससह, 24 प्रशासकीय प्रभागांमध्ये कार्यरत 95 पथकांनी 2,900 साइट्सना सूचना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच 190 साईट्सना कारणे दाखवा नोटिसा जारी केल्या आहेत. (हेही वाचा -Mumbai, Pune Air Quality: हुश्श्य! मुंबई, पुणे शहरातील वायू प्रदूषणावर पावसाचा उतारा, हवेची गुणवत्ता पातळी सुधारली)
दरम्यान, कारणे दाखवा नोटीस प्राप्त करणार्या बांधकाम साइट्सना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी आणि त्यांच्या साइटवर वायू प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी विशिष्ट वेळ दिला जाईल. तसे न केल्यास त्यांचे काम त्वरित थांबवले जाईल, असे एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या आठवड्यात बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कामही बीएमसीने थांबवले होते.
एच पश्चिम - वांद्रे पश्चिम, पी उत्तर - मालाड, टी - मुलुंड, इत्यादी भागात काम थांबवण्याच्या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. याशिवाय, भुलेश्वर, झवेरी बाजार आणि साकी नाका येथे विषारी वायू उत्सर्जित करणाऱ्या चिमण्या काढण्यात आल्या आहेत. बीएमसीने कचऱ्याच्या तक्रारींसाठी 'मुख्यमंत्री क्लीन मुंबई हेल्पलाइन' म्हणून ओळखला जाणारा समर्पित व्हॉट्सअॅप नंबर, 81696-81696 सुरू केला आहे. बीएमसीने यापूर्वी 25 ऑक्टोबर रोजी वायू प्रदूषण कमी करण्यासाठी 27-बिंदू मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.
हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत, शनिवारी सकाळी, एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ने 89 चा AQI प्रदर्शित केला, जो 'चांगला' मानला गेला. तथापि, रविवारी एकूण AQI 125 (खराब) वर पोहोचला. दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरात फटाके फोडण्याचे प्रमाण वाढले होते. BKC ने 205 AQI नोंदवला (अनारोग्य), तर AQI पातळी बोरिवली - 143, माझगाव - 149, आणि मालाड - 190 मध्ये खराब होती. कुलाबा - 97, वरळी - 74, अंधेरी - 82 मध्ये हवेची गुणवत्ता मध्यम पातळीवर राहिली.