अहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय?
(File Photo)

Ahmednagar Municipal Elections 2018: प्रत्यक्ष मतदानाचा दिवस जवळ येऊ लागल्याने अहमदनगरमध्ये राजकीय पक्षांनी आपापली पावले सावध टाकायला सुरुवात केली आहेत. अद्याप नगरच्या महापालिका राजकारणाची हवा म्हणावी तशी तापली नसली तरी, राजकीय वर्तुळातील हालचालींनी मात्र चांगलाच वेग घेतला आहे. २९ डिसेंबरला अहमदनगर पालिकेची मुदत संपत आहे. त्यामुळे येत्या ९ डिसेंबरला येथे निवडणुक पार पडत आहे. तर, लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे.

शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

दरम्यान, शिवसेना खासदार आणि शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह २० जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत रामदास कदम, संजय राऊत, गजाजन किर्तीकर, आनंदराव आडसूळ, एकनाथ शिंदे, संजय राठोड, दादा भुसे, विजय शिवतरे, गुलाबराव पाटील, अनिल देसाई, आदेश बांदेकर, अरविंद सावंत, रविंद्र मिर्लेकर, विश्वनाथ नेरूरकर, निलमताई गोºहे, नितीन बानगुडे पाटील, भाऊ कोरगावकर,शिवरत्न शेटे यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती

अहमदनगर महानगरपालिकेत आपल्याच घड्याळाचा गजर व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही कार्यरत झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. मुलाखतींसाठी आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप आणि माजी आमदार दादा कळमकर यांच्यासह १८ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रीय काँग्रेससोबत आगाडी होणार की नाही हे स्पष्ट न झाल्याने काही जागांचा निर्णय झाला नाही. आघाडी झाल्यास चर्चेनंतर काही जागा या मित्रपक्षाला सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे आघाडीच्या बोलण्यानंतरच काही जागांवर निर्णय होणार आहे.

काँग्रेसकडूनही चाचपणी सुरु

दरम्यान, अहमदनगर महापालिकेसाठी काँग्रेसकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्यांची एक बैठक मुंबईला पार पडणार होती. या बैठकीत राष्ट्रवादीसोबत आघाडीसंदर्भात चर्चा होणार होती. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार होता. मात्र, अद्याप या बैठीकीतील पूर्ण तपशिल बाहेर आला नाही. (हेही वाचा, धुळे महापालिका निवडणूक 2018: धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला)

भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी; मुंबईला यादी

दरम्यान, भाजपनेही इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मात्र, उमेदवारांच्या एकूण संख्येच्या प्रमाणात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने कोणताही निर्णय न घेता इच्छुकांची यादी मुंबईला पाठवल्याचे समजते. दोन दिवसात तब्बल २६७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या.भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी, कोअर कमिटीचे सदस्य आणि पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. दिलीप गांधी, प्रा. भानुदास बेरड, किशोर बोरा, सुनील रामदासी यांनी या मुलाखती घेतल्या. या वेळी भाजपच्या इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले.

दरम्यान, शहरात एक नोव्हेंबरपासूनच आदर्श अचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या खास करुन सत्ताधारी पक्षाला घोषणा, अश्वासने आणि विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमांना आवर घालावा लागत आहे. अहमदनगर शहराची एकूण लोकसंख्या पाहता तो आकडा आहे ३ लाख ४६ हजार. तर, त्यापैकी एकूण मतदार आहेत २ लाख ५६ हजार ७१९. ही निवडणूक एकूण १७ प्रभागांतील ६८ जागांसाठी होणार आहे. पैकी ४३ जागा या महिलांसाठी राखीव आहेत. तर, अनुसुचीत जातीसाठी ९, अनुसुचीत जमातीसाटी १, तर नागरिकांच्या मागास प्रवार्गासाठी १८ जागा राखीव आहेत.