अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग (Ahmednagar District Hospital Fire Case) प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने कठोर कारवाई केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी या कारवाईबाबत ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार या प्रकरणाची एका समितीद्वारे चौकशी सुरु आहे. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन परिचारिकांवर कारवाईचा आसूड ओढण्यात आला आहे.
आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे
- डॉ. सुनील पोखरणा- जिल्हा शल्य चिकित्सक- निलंबित
- डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी- निलंबित
- डॉ. विशाखा शिंदे – वैद्यकीय अधिकारी- निलंबित
- सपना पठारे- स्टाफ नर्स – निलंबित
- आस्मा शेख – स्टाफ नर्स – सेवा समाप्त
- चन्ना आनंत – स्टाफ नर्स- सेवा समाप्त
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात लागलेल्या आगित 11 जणांचा मृत्यू झाला होता. तर इतर रुग्ण गंभीर जखमी झाले होते. या विभागात दुर्घटना घडली तेव्हा एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते. दुर्घटना घडल्यानंर विरोधक आणि एकूणच सर्व स्तरांतून राज्य सरकार आणि प्रशासनावर टीकेची झोड उडविण्यात आली होती.
ट्विट
Ahmednagar fire at a district hospital | Services suspended- Dist Surgeon Sunil Pokharna, Medical Officer Suresh Dhakne, Medical Officer Vishakha Shinde, Staff Nurse Sapna Pathare; Services terminated- Staff nurses Asma Shaikh and Channa Anant: Maharashtra Health Min Rajesh Tope pic.twitter.com/PrkwsH2Aje
— ANI (@ANI) November 8, 2021
पाठीमागील काही महिन्यांपासून रुग्णालयांना लागणाऱ्या आगीचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने कोरोना व्हायरस महामारीत रुग्णालयांना आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. काहींना कायमचे अपंगत्व तर काहींना गंभीर शारीरिक दुखापती आणि आजारांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णालयांना लागणाऱ्या आगी ही एक गंभीर समस्या ठरली आहे. राज्य सरकारने राज्यातील सर्वच रुग्णालयांना आग आणि सुरक्षेबाबतचे ऑडीट करण्याचे आदेश दिले आहेत. परंतू, अद्यापही अनेक रुग्णालयांनी हे ऑडीट केले नसल्याचे अनेकदा पुढे आले आहे.