महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; संजय राऊत यांचा ट्वीट च्या माध्यमातून भाजपा ला पुन्हा टोला
Sanjay Raut | Photo Credit :- Facebook

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका पार पडल्यानंतर आता महिन्याभराने राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मतदारांनी शिवसेना - भाजपा युतीला स्पष्ट बहुमत देऊनही ते सरकार स्थापन करू शकले नव्हते. मुख्यमंत्रीपदावरून तणावग्रस्त झालेल्या दोन्ही पक्षांमधील संबंधानंतर आता भाजपाला सोडून शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षासोबत जाऊन सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. दरम्यान या स्थितीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करून आपल्या भावना पुन्हा मोकळ्या केल्या आहेत. काही वेळेस अहंकाराने नव्हे तर स्वाभिमानासाठी काही नात्यांमधून बाहेर पडावं लागतं अशा आशयाचं ट्वीट त्यांनी करत भाजपाला उपरोधित टोला लगावला आहे. 'सत्तास्थापनेबाबत पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येईल'- संजय राऊत.

 

संजय राऊत मागील महिन्याभरापासून नियमित महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर टीपण्णी करत आहेत. आजही त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपासून शिवसेना - भाजपा नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे.

संजय राऊत यांचे ट्वीट

कभी कभी कुछ रिश्‍तों से बाहर निकल आना ही अच्‍छा होता है। अहंकार के लिए नहीं... स्‍वाभिमान के लिए असं ट्वीट केलं आहे. विधानसभा निवडणूकीला शिवसेना - भाजपा एकत्र सामोरे गेले होते. 288 जागांपैकी भाजपाला 105 तर शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळवता आला. मात्र आपापसातील मतभेदांमुळे ते एकत्र सत्ता स्थापन करू शकले नाहीत.

दरम्यान आज मातोश्री बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक होणार आहे. आज सत्ता स्थापनेसाठी अंतिम टप्प्यातील बोलणी करून लवकरच नवं सरकार स्थापन होणार आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस कडे उपमुख्यमंत्री पद जाऊ शकतं अशी चर्चा रंगली आहे.