Tsunami Waves (Photo Credits: PTI)

भारतीय हवामान खात्याने 'महा' चक्रीवादळाच्या (MAHA Cyclone) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह गुजरात, दीव दमण, दादरा नगर हवेली या राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. आज नव्याने जाहीर करण्यात हवामानाच्या अंदाजानुसार, 6 आणि 7 नोव्हेंबर दिवशी मध्यम ते अति मुसळधार महा चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. दरम्यान या काळात मच्छीमारांनी 6 नोव्हेंबर पर्यंत मासेमारीसाठी समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्र किनार्‍यांपासूनही दूर रहावे असे देखील सांगण्यात आले आहे.

हवामान खात्याने काही दिवसांपूर्वीच 'महा' या चक्रीवादळाचा धोका वर्तवला होता. त्यानुसार महाराष्ट्रात मागील काही दिवस ढगाळ वातावरण होते. तसेच अवकाळी पावसाच्या दमदार पाऊस बरसला होता.

ANI Tweet

महाराष्ट्रात कसं असेल वातावरण ?

महाराष्ट्रात 50-60 kmph च्या वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच सकाळी 6 वाजल्यापासूनच वातावरणामध्ये बदल होण्यास सुरूवात होईल. तसेच ठाणे, पालघर भागामध्ये पुढील 12 तास हा धोका असेल.

महाराष्ट्रात यादरम्यान पावसाचादेखील धोका आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात 7 नोव्हेंबर पर्यंत पावसाची बरसात होण्याची शक्यता आहे.

मागील चार महिन्यातील ' महा' हे चौथे चक्रीवादळ आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 'महा' चक्रीवादळ निर्माण झाले आहे. मागील काही दिवसात चक्रीवादळाच्या तडाख्याने शेतकरी आणि मच्छीमारांचे मोठं नुकसान झालं आहे. कोकण किनारपट्टीवरही नुकसान झाले आहे. त्यामुळे सामान्यांसह शेतकरी आणि मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.