गणेशोत्सव 2019 साठी FDA सज्ज; भिवंडीमध्ये बनावट खवा, सॉस बनवणार्‍या कंपनीवर धाड
Khoya (Image: PTI/Representational)

गणेशोत्सवाच्या काळात मिठाई बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खवा बाजारात उपलब्ध केला जातो. मात्र यामध्ये भेसळयुक्त खवा असल्याने अनेकांच्या जीवावर त्यापासून बनवलेले पदार्थ, मिठाई आल्याने हे सारे जीवावर बेतू नये म्हणून एफडीएने आता धाडसत्र टाकण्यास सुरूवात केली आहे. नुकतेच भिवंडीमध्ये एम एम फूड्स येथे विनापरवाना सुरू असलेल्या कंपानीवर छापा टाकत सुमारे2 लाख रूपयांचा खवा जप्त केला आहे.

भिवंडीतील लोनाड हरणपाडा येथे एक कंपनी विनापरवाना खवा विक्री करत असल्याची माहिती एफडीएला मिळाली. त्यानंतर त्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये कंपनीकडे कोणताही शासकीय परवाना मिळाला नाही. तसेच हलक्या दर्जाचा बनावट खवा विकत असल्याचंही त्यांच्या निदर्शनास आले. या कंपनीने त्यापासून बर्फी बनवून 125 रूपये किलो दराने विकल्याची बाबही समोर आली आहे.

चायनीज पदार्थांमध्ये हमखास वापरण्यात येणारा सोया सॉसदेखील या धाडसत्रामध्ये जप्त करण्यात आला आहे. केमिकल कलर आणि भेसळयुक्त पदार्थ वापरून विविध सॉस बनवत असल्याचं उघडकीस आलं आहे.

सणासुदीच्या काळात खवा आणि त्यापासून बनणारे इतर पदार्थ विकत घेताना पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आता एफडीए म्हणजेच अन्न व औषध प्रशासन पुरेशी काळजी घेत असल्याचंही सांगत आहेत.