आज अंगारकी संकष्टी चतुर्थी (Angarki Sankashti Chaturthi) चं औचित्य साधत कोकणातील दिवेआगार (Diveagar) मध्ये सोन्याच्या गणेशमूर्तीची पुन्हा स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नव्या सोन्याच्या मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात आल्या आहेत. दरम्यान 23 मार्च 2012 साली काही दरोडेखोरांनी सिक्युरिटी गार्डचा खून करून सोन्याच्या गणपतीचा मुखवटा आणि दागिने लंपास केले होते. त्यानंतर आता पुन्हा सुवर्ण गणेशाचा मुखवटा स्थापन करण्यात आला आहे.
दरम्यान दरोडेखोर्यांनी 1 किलो 600 ग्राम सोनं लंपास केले आहे होते. पोलिसांनी दरोडेखोर्यांचा ठावठिकाणा लावला त्यावेळेस त्यांच्याकडून वितळवलेल्या सोन्याच्या मुखवट्यातून 1 किलो 351 ग्राम सोने हस्तगत करण्यात आले होते. रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने उच्च न्यायालयात सोनं पुन्हा मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई झाली. त्यामध्ये सोने पुन्हा राज्य सरकारला द्यावं असा निर्णय उच्च न्यायालयाने सुनावला होता.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा प्रमाणे मुद्देमालातून सुवर्ण गणेशाच्या पूर्वीच्या मुखवट्याप्रमाणेच नवीन मुखवटा तयार करुन त्याची प्रतिष्ठापना करावी. त्याची कार्यवाही जिल्हा प्रशासन व दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्ट यांनी एकत्र करावी, असे निर्देश राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते.
पु ना गाडगीळ यांनी सुवर्ण गणेशाचा नव्याने मुखवटा बनवला आहे. आज अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून सुवर्ण गणेशाच्या मुखवट्यांची गणेश मंदिरात नव्याने पुनर्स्थापना करण्यात आली आहे. 9 वर्षांनंतर सुवर्ण गणेशाची नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात पुनर्स्थापना होणार असल्याने भाविकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.