Aditya Thackeray | (Photo Credit - Twitter)

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) असा 'सामना' अधिक तीव्र होताना दिसतो आहे. एकनाथ शिंदे गटातील तानाजी सावंत यांनी तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावरच थेट टीकास्त्र सोडत ते कोण आहेत? असाच सवाल विचारला. तानाजी सावंत यांच्या टीकेला आदित्य ठाकरे यांनीही मग जोरदार प्रत्युत्तर दिले. आदित्य ठाकरे यांनी तानाजी सावंत यांच्यावरील टीकेला प्रत्युतर देताना म्हटले की, 'त्यांना असाच विचार करत राहू दे, भ्रमात राहू दे, आम्ही लक्षही देत नाही. जनता उद्धव ठाकरे आणि आमच्या पाठिमागे आहे. जनतेला गद्दारी आवडली नाही', असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, ठाकरे कुटुंबाला एकटे पाडण्याचा 40 गद्दारांचा प्रयत्न कायम सुरु आहे. परंतू, लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद पाहता त्यांना त्यात यश येत नाही. आम्हाला खात्री आहे. लोक ठाकरे कुटुंबाला एकटं पडू देणार नाहीत. महाराष्ट्रात मी अनेक ठिकाणी जातो आहे. पाहतो आहे. लोक उत्स्फूर्तपणे भेटायला येत आहेत. प्रत्येकजण सांगतो आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. लोकांनाही ही गद्दारी आवडली नसल्याचे लोकच सांगतात, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, Tanaji Sawant on Aditya Thackeray: कोण आदित्य ठाकरे? एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा सवाल)

काय म्हणाले होते तानाजी सावंत?

कोण आदित्य ठाकरे? मी त्यांना ओळखत नाही. तो केवळ एक आमदार आहे. त्यापलीकडे त्यांची ओळख नाही. त्यांचे कर्तृत्व ते काय? असा सवाल तानाजी सावंत यांनी विचारला होता. तसेच, त्यांच्यासोबत आता कोणीही राहिले नाही. सर्व शिवसैनिक एकनाथ शिंदे आणि आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यासोबत कोणीच उरले नसल्याचेही तानाजी सावंत यांनी म्हटले होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मात्र तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर तीखट प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तृत्व हेच आदित्य ठाकरे यांचे कर्तृत्व आहे. मातोश्री, उद्धव ठाकरे अथवा आदित्य ठाकरे यांच्यावर बोलाल तर याद राखा असा ईशाराही चंद्रकांत खैरे यांनी सावंतांना दिला आहे.