शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) बुधवारी एक दिवसीय बिहार दौऱ्यावर (Bihar Tour) जाणार आहेत. या दौऱ्यात ते पाटण्याला जाणार आहेत. बिहार दौऱ्यात आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट घेणार आहेत. आदित्य ठाकरेंसह महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या नेत्यांमध्ये खासदार अनिल देसाई (Anil Desai) आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांचा समावेश असेल. आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्याची माहिती शिवसेना गटाचे सचिव सूरज चव्हाण यांनी प्रसिद्ध केली आहे. आदित्य यांच्या बिहार दौऱ्याकडे तेजस्वी यादव यांच्याकडून सदिच्छा म्हणून पाहिले जात आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर मंगळवारी शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचले. येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीरमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत संजय राऊत सहभागी होऊ शकतात. हेही वाचा अनिल परब दाखल करणार किरीट सोमय्या यांच्या विरोधात तक्रार आणि याचिका; प्रतिमा बदनाम केल्याचा आरोप
यापूर्वी आदित्य ठाकरेही राहुल यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात सामील झाले आहेत. अशा परिस्थितीत आता आदित्य ठाकरेंच्या बिहार दौर्यावरून विविध शक्ती भाजपविरोधात संवाद वाढवत असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्याच्या सरकारच्या विरोधात सर्व शक्ती एकवटत असतील तर त्यात गैर काय, असा टोलाही संजय राऊत यांनी मंगळवारी लगावला. लोकशाहीत असे घडते, ही एक सामान्य घटना आहे.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारकडून कोश्यारींना परत बोलावण्याची मागणी केली आहे. भाजपचे नेतेही राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन करू शकले नाहीत आणि राज्यपालांवर टीका करताना दिसत आहेत, असे प्रथमच घडले आहे.
नीट विचार करून बोला, असा सल्लाही शिंदे गटाने राज्यपालांना दिला आहे. अशा परिस्थितीत केंद्राने राज्यपालांना दिल्लीत बोलावल्याचेही वृत्त आहे. राज्यपाल दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, आदित्यचा बिहार दौरा, राऊत यांचा संभाव्य काश्मीर दौरा राजकारणात कोणते नवे वळण घेणार हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल.