Premises of Dr BR Ambedkar's house vandalised (Photo Credits: ANI)

मुंबईच्या (Mumbai) दादर येथील हिंदू कॉलनीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr BR Ambedkar) यांचे निवासस्थान 'राजगृह' (Rajgruha) ची, अज्ञातांनी तोडफोड केली होती. हा प्रकार 7 जुलै रोजी घडला होता. या घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये आरोपींच्या विरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली होती. आता या प्रकरणी एका संशयितास अटक केली आहे. उमेश सीताराम जाधव (Umesh Sitaram Jadhav) असे या आरोपीचे नाव असून, माटुंगा पोलिसांनी (Matunga Police) याबाबत माहिती दिली आहे.

घडल्या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपवण्यात आले होते. त्यामधील चेहऱ्याशी साधर्म्य असल्यामुळे या संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी सोबत आणखी एक व्यक्ती असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. आता पोलीस दुसऱ्या व्यक्तीच्या शोधात आहेत. उमेश जाधव हा प्रेस भागात राहणारा 35 वर्षांचा तरुण आहे. तो बिगारी काम करतो अशी माहिती समोर आली आहे.

एएनआय ट्वीट-

7 जुलै रोजी संध्याकाळी दोन इसमांनी 'राजगृह' येथे तोडफोड केली. यामध्ये घरा सभोवतालच्या कुंड्या व झाडांची नासधूस झाली आहे. राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. यासह घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांचीही तोडफोड केली आहे. घडलेला प्रकार अतिशय निषेधार्त आहे असे मत अनेक नेत्यांनी व्यक्त केले होते. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घडलेल्या गोष्टीचा निषेध केला असून, दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल असे सांगितले आहे. तसेच 'राजगृह' ची तोडफोड करणाऱ्या दोषींविरुद्ध कडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. (हेही वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृह'ची अज्ञातांनी केली तोडफोड; गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून दोषींविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा)

या घटनेनंतर राजगृहची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राजगृहाबाहेर 24 तास सुरक्षेबरोबरच, गुरूवारी राजगृहासमोरील दोन बस थांबेही सुरक्षेच्या कारणात्सव हटविण्यात आले आहेत. यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजगृहाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.