Central Railway AC Local (Photo Credits: ANI/Twitter)

पश्चिम (Western Railway) आणि ट्रान्सहार्बर रेल्वे (Trans harbor Railway) मार्गावर एसी लोकल सेवा सुरु झाल्यानंतर मध्य रेल्वेचे (Central Railway) प्रवासी या वातानुकूलित लोकलची (AC Local Railway) आतुरतेने वाट पाहात होते. मात्र प्रतिक्षा अखेर संपली असून आजपासून ही लोकल सेवा सुरु झाली आहे. आज सकाळी सीएसएमटीहून ही एसी लोकल कल्याणच्या (CSMT-Kalyan) दिशेला सोडण्यात आली. आजपासून मध्य रेल्वे मार्गावर दिवसा 10 एसी लोकल्स धावतील. तसेच ही लोकल सुरु झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. या लोकलच्या उन्हाळ्यात खूपच फायदा होईल आणि उन्हाळ्यात आरामदायी आणि वातानुकूलित असा प्रवास सुरु होईल अशी प्रतिक्रिया अनेक रेल्वे प्रवाशांनी दिली आहे.

कालच (16 डिसेंबर) या एसी लोकलला मध्य रेल्वे मार्गावर सुरु करण्यास हिरवा कंदिल मिळाला होता. त्यानंतर आजपासून ही सेवा सुरु देखील करण्यात आली. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.हेदेखील वाचा- Mumbai AC Local Update: मध्य रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार वातानुकूलित, सीएसएमटी ते कल्याण दरम्यान उद्यापासून धावणार 10 एसी लोकल्स

25 डिसेंबर 2017 मध्ये मुंबईत पहिली एसी लोकल सुरु झाली होती. ही लोकल पश्चिम रेल्वेवर सुरु करण्यात आली होती. त्यानंतर ट्रान्सहार्बर मार्गावर जानेवारी 2020 मध्ये ठाणे ते पनवेल एसी लोकल सेवा सुरु करण्यात आली होती. त्यामुळे मध्य रेल्वेची प्रवासी या लोकलची प्रतिक्षा करत होते. ही प्रतिक्षा अखेर संपली असून आज मध्य रेल्वे मार्गावर ही एसी लोकल धावली.

यामध्ये मध्य रेल्वे मार्गावर सकाळी वातानुकूलित एसी लोकलच्या दोन फे-या आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी इतर फे-या सोडण्यात याव्या यावर विचार सुरु आहे, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. तसेच हार्बर मार्गावरही लवकर ही वातानुकूलित एसी लोकल सेवा सुरु व्हावी याबाबत विचार केला जात आहे.