Abduction Of Businessman: लोकसभा निवडणूक लढविलेल्या उमेदवाराकडून व्यावसायिकाचं अपहरण; आरोपी प्रदीप सरोदे यास अटक
Arrest | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

पैशाच्या वादातून राकेश पांडे नामक 45 वर्षीय व्यवसायिकाचे मुंबईतून अपहरण (Abduction Of Businessman) करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रदीप सरोदे (Pradip Sarode) हा 34 वर्षीय व्यक्ती या अपहरण (Abduction0 प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. मुंबई येथील भररस्त्यातून हे अपहरण घडले होते. माडाड येथील दिंडोशी येथे रविवारी साडे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हे शाखा पोलीस तपास करत होते. धक्कादायक असे की, आरोपी प्रदीप सरोदे या आरोपीने शिर्डी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक 2019 लढवली आहे. त्याला 15 हजार मतेही मिळाली होती.

पोलिसांनी सांगितले की, राकेश पांडे यांचे अपहरण काही मास्क घातलेल्या व्यक्ती करत होत्या असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते. तपास करुन पोलिसांनी आोरपी प्रदीप सरोदे याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने पोलिसांना सांगितले की, व्यावसायिक राकेश पांडे यांनी आपल्या वडिलांकडून काही पैसे घेतले होते. हे पैसे त्याने मुदत उलटून गेल्यावरही परत केले नव्हते. त्यामुळेच त्याचे अपहरण करण्यात आल्याचा दावा आोरपीने केला आहे. (हेही वाचा, Thane Rape Case: अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कारप्रकरणी ठाण्यातील 19 वर्षीय तरुणाला अटक)

दरम्यान, क्राइम ब्रांच आणि दिंडोशी पोलीस अशा दोन टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना दिंडोशी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप सरोदे याच्या आतापर्यंत जवळपास 10 गुन्हे दाखल आहेत. यात सर्वाधिक गुन्हे फसवणुकीचे आहेत. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्याला 15000 मतेही मिळाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, व्यावसायिक राकेश पांडे यांच्यावरही फसवणूक आणि इतर काही गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, राकेश पांडे हे रविवारी दिंडोशी येथे कार पार्क करुन बाहे आले. या वेळी मास्क घातलेल्या तीन व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. ही घटना एका व्यक्तीने पाहिली. त्याने फोन करुन पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींना अटक केली.

दरम्यान, राकेश पांडे यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना नाशिक येथे सोडून देण्यात आले. त्यानंतर पांडे घरी परतले. पोलिसांशी बोलताना त्यांनी आपले अपहरण कोणी केले हे माहिती नसल्याचे सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मात्र आरोपींची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथकं नवी मुंबई, ठाणे आणि अहमदनगरला पाठवली. आरोपी प्रदीप सरोदेला अहमदनगरमध्ये तर इतर चौघांना ठाण्यातून अटक करण्यात आली.