‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (Aapla Dawakhana) योजनेचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत विस्तार करण्यात आला. या योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजीटल अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
‘सामान्य माणसांचा विचार करून लोकाभिमुख, लोकोपयोगी निर्णय घेण्यात सरकार प्रयत्नशील असून, त्यामध्ये आपला दवाखाना ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज राज्यातील 317 तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजना सुरू करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे 30 चाचण्या मोफत करण्यात येतील.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपल्याला कोरोनाने आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा धडा दिला आहे. छोट्या छोट्या आजारांवरील उपचारासाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी करावा लागेल. या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन आपण ठाणे येथून या योजनेची सुरुवात केली होती. त्याची अंमलबजावणी मुंबईमध्ये सुरू केली आणि आता संपूर्ण राज्यात आपला दवाखाना सुरू होत आहे.
आज मुंबईमध्ये सुमारे 250 आपला दवाखाना कार्यरत आहेत. त्याचा लाभ लाखो रुग्णांना होत आहे. आता या योजनेमुळे ग्रामीण भागात सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत 6,200 रुग्णांना एकूण 52 कोटी रुपयांहून अधिकची मदत करता आल्याचे नमूद करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत लाखो रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला आहे. (हेही वाचा: Shiv Sena Delhi Unit: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या दिल्ली युनिटचा शुभारंभ; शहरात विकासाचे 'महाराष्ट्र मॉडेल' राबविण्याची ग्वाही)
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही अतिशय उत्तम संकल्पना आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून 30 सेवा, औषध आणि वैद्यकीय सल्ला देखील मोफत मिळणार आहे. सामान्य माणसांच्या आरोग्याची काळजी घेणार हा उपक्रम आहे. आपण अर्थसंकल्पातच या संकल्पनेसाठी तरतूद केली होती. यात 500 दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत. त्यातील आज 317 दवाखाने सुरु होत आहेत.