Santa Claus in Mumbai (Photo Credits; ANI/Twitter)

ख्रिस्ती बांधवांचा वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण 'ख्रिसमस' (Christmas) आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. या सणासाठी सर्वत्र लगबग सुरु झाली आहे. ख्रिसमस ट्री सजू लागली. ठिकठिकाणी, गल्लीबोळ्यात प्रतिकात्मक सांताक्लॉज (Santa Claus) बनविण्याची तयारी सुरु आहे. अशात काही जण स्वत:ला सांताक्लॉज बनून लहान मुलांना चॉकलेट्स, गिफ्ट्स देतात. गेली अनेक वर्षे ही प्रथा सुरु आहे. मात्र यंदा या प्रथेमध्ये थोडसं वेगळेपण आणले आहे. मुंबईतील कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती लक्षात घेता येथील एक व्यक्तीने सांताक्लॉज बनून मुंबईतील रस्त्यांवर सॅनिटायजेशन (Sanitization) करताना दिसला. तर काही ठिकाणी या सांताने नागरिकांना सॅनिटायजर देऊन, मास्क देऊन लोकांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याचा संदेश देखील दिला.

हा सांताक्लॉज मुंबईतील वडाळा, सायन, राणी लक्ष्मी चौक परिसरात हे सामाजिक कार्य करताना दिसला. हा व्यक्ती गेली अनेक वर्षे ख्रिसमसच्या 3-4 दिवस आधी सांताक्लॉज बनून मुंबईच्या रस्त्यांरस्त्यांवर जाऊन लहान मुलांना गिफ्ट, चॉकलेट्स देतो. मात्र यंदा कोरोनाचा धोका लक्षात घेता या सांताने एक वेगळा उपक्रम राबविला आहे.हेदेखील वाचा- Christmas Star: या महिन्यात तब्बल 800 वर्षानंतर आकाशात दिसणार मोठी खगोलशास्त्रीय घटना; दर्शन होणार 'ख्रिसमस स्टार'चे, जाणून घ्या सविस्तर  

कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी माझे थोडेसे योगदान असे सांगत या सांताक्लॉजने रस्त्यारस्त्यांवर जाऊन लोकांच्या हातावर सॅनिटायजर देणे, तसेच मास्क आणि आणि बसस्टॉप आणि रस्त्यावर सॅनिटाईज करताना दिसत आहे. पुढील 3-4 दिवस तो हा उपक्रम करणार असल्याचे त्याने सांगितले.

मुंबईत काल (17 डिसेंबर) दिवसभरात 586 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 10 जण दगावल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. यामुळे मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,84,990 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 11,017 वर पोहोचला आहे. सद्य घडीला मुंबईत 7031 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 2,66,101 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.