उस्मानाबाद मध्ये आजपासून 3 दिवस रंगणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ना.धो. महानोर राहणार
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Photo Credits: Facebook

महाराष्ट्रात आज 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात होणार आहे. उस्मानाबाद मध्ये आयोजित या मराठी साहित्य संमेलनामध्ये आज (10 जानेवारी) सकाळी ग्रंथदिडीला सुरूवात झाली आहे. तर संध्याकाळी 4 च्या सुमारास संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो देखील हजर राहणार आहेत. दिब्रिटो यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे.

आज संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून अध्यक्षीय भाषण पार पडणार आहे. तर ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांना संमेलनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. महानोर यांना उद्घाटनाला उपस्थित न राहण्याचा धमकीचा फोन आल्याने काही काळ संभ्रम होता मात्र आता या पार्श्वभूमीवर महानोर आणि दिब्रिटो या दोघांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. (हेही वाचा: जेष्ठ कवी, पद्मश्री ना. धों. महानोर करणार 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन)

यंदा आयोजित 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सांगता सोहळा 12 जानेवारीला आहे. या तीन दिवसांच्या कार्यक्रमात कवीकट्टा आणि परिसंवाद यासारखे कार्यक्रम होणार आहेत. तर यंदादेखील मराठी साहित्य संमेलन आणि वाद ही परंपरा कायम राहिली आहे. ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पुण्याच्या ब्राह्मण महासंघाने अध्यक्षपद निवडीवरुन विरोध केला होता. यंदा ख्रिस्ती बांधव देखील उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत.