दिलासादायक! आरे वसाहतीकडून 812 एकर जमिनीचा ताबा वन विभागाकडे सोपविल्याने मुंबईच्या मध्यभागी भव्य जंगल फुलविण्याचा मार्ग झाला मोकळा
Aarey Colony (Photo credits: Video grab)

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ आरे वसाहतीच्या राखीव जागेबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आरे दूध वसाहतीतील (Aarey Milk Colony) 812 एकर जागा वनासाठी राखून ठेवून ही जागा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. बोरीवली, गोरेगाव, मरोल मारोशी आणि मरोल मारोशी गाव येथील जमिनीचा समावेश असून ही आरे जमीन अधिकृतपणे राज्य वन विभाग आणि एसजीएनपीकडे देण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मुख्य वनसंरक्षक यांना हा ताबा मिळाल्याने मुंबई सारख्या महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल फुलवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बोरीवली तहसीलदार आणि नगर भूमापन अधिकारी मालाड यांच्या उपस्थितीत ताबा घेण्यात आला. या निर्णयामुळे मुंबईच्या मध्यभागी भव्य जंगलाला बहर मिळू शकेल असे ट्विट CMO च्या अधिकृत पेजवरून सांगण्यात आले आहे.हेदेखील वाचा- World Environment Day 2021 Messages: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त Quotes, Messages, Wallpapers, WhatsApp Status, Images पाठवत करा निसर्गाबद्दल जनजागृती

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला होता. बोरिवलीतील आरे, गोरेगाव तसेच मरोळ मरोशी येथील क्षेत्राचा ताबा देण्यात आला आहे. आरे येथील 125.422 हेक्टर, गोरेगाव येथील 71.621 हेक्टर आणि मरोळ मरोशी येथील 89.679 हेक्टर इतकी जागा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. याव्यतिरिक्त मरोळ मरोशी गावातील 40.469 हेक्टर जागा यापूर्वीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात देण्यात आली आहे. अशा रीतीने 812 एकर जागेवर आता वन विभाग जंगल फुलवू शकते.