2019-20 शैक्षणिक वर्षात शाळांना तब्बल 76 दिवस सुट्ट्या; विदर्भातील शाळा 26 जूनला सुरु, तर इतर शाळा 17 जूनला
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : commons.wikimedia)

शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत, आज निकालाची प्रतीक्षा असताना आगामी 2019-20 शैक्षणिक वर्षातील सुट्टीचेही वेध लागले आहेत. 2019-20 शैक्षणिक वर्षात शाळांना तब्बल 76 दिवस सुट्टी असणार आहे, तर 230 दिवस शाळेचे कामकाज सुरू ठेवावे लागणार आहे. यंदा 21 ऑक्टोबरपासून शाळांना दिवाळीची सुट्टी सुरु होणार आहे. यावेळी विदर्भातील शाळा 26 जूनला सुरु होणार आहेत, तर राज्यातील उर्वरित शाळा 17 जूनला सुरु होतील. नुकतेच याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती केली जाते. त्यानुसार यावर्षी 76 सुट्ट्या असणार आहेत, पैकी गणेशोत्सव, दिवाळी, नाताळ अशा दीर्घ सुट्ट्यांचे नियोजन लवकरच करण्यात येणार आहे. यामध्ये शासकीय स्तरावरून जाहीर झालेल्या सर्व सार्वजनिक सुट्या शाळा व ज्युनिअर कॉलेजांनी घेणे बंधनकारक आहे.1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन केल्याप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्या लागू होणार आहेत. (हेही वाचा: मुंबईत तब्बल 211 अनधिकृत शाळा; महानगरपालिकेने जाहीर केली नावे)

प्रयोग शाळा सहायक व प्रयोगशाळा परिचर हे कर्मचारी वगळून इतर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दीर्घ सुट्ट्या देता येणार नाहीत. मात्र दीर्घ सुट्ट्यांच्या कालावधीतील सार्वजनिक सुट्ट्या त्यांना द्याव्या लागणार आहेत. तसेच आपापल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने शाळा उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी कमी करून गणेशोत्सव, नाताळ यासारख्या सणांसाठी जड सुट्ट्या घेऊ शकतात.