धक्कादायक! पतंग उडवत असताना चायनीज मांजा मानेला गुंडाळला गेल्याने 7 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू
Kite Flying | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मकर संक्रांतीच्या उत्सवाची धामधुम सुरु होत असतानाच धामणगाव (Dhamangaon) रेल्वे तालुक्यातील वसाड गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडविणा-या 7 वर्षांच्या चिमुकल्याचा मानेला चायनीज मांजा गुंडाळला गेल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. न्यूज 18 लोकमतच्या वृत्तानुसार, वेदांत हेंबाडे असे या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेने संपू्रण वसाड परिसरात शोककळा पसरली आहे. पतंग उडविणे या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याने संपूर्ण हेंबाडे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धामणगाव रेल्वे शहरात वास्तव्यास असलेल्या वेदांत पतंग उडविण्याचा हट्ट करत होता. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला पतंग आणि मांजा आणून दिला. वेदांत गच्चीवर पतंग उडवत असताना त्याच्या मानेला मांजा गुंडाळला गेला. मान कापल्याने गंभीर जखम झाल्यामुळे वेदांतला अमरावती येथे खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले होते. त्याची प्रकृती खालावल्याने रविवारी रात्री त्याला वसाड गावाहून अमरावती येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेदेखील वाचा- Makar Sankranti 2020: घरगुती पतंग बनवण्याची सोपी पद्धत घ्या जाणून, पाहा DIY चा संपूर्ण व्हिडिओ

राज्य सरकारने 1986 पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5 नुसार मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. बंदी असतानाही बाजारपेठेत चायनीज व नायलॉन मांजाची धडाक्यात विक्री सुरू असल्याने या घातक मांजावरील बंदी ही केवळ कागदावरच ठरत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी आणि चायनीज मांजा वापर टाळावा.

संक्रांतीच्या निमित्ताने आकाशात उंचच उंच पतंग उडविण्याचा मोह सर्वांना होतो. मात्र पतंग उडविताना योग्य ती काळजी घेतल्यास तुम्ही अगदी मनसोक्तपणे पतंग उडविण्याची मजा घेऊ शकता.