![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/01/Obscene-Video.jpg?width=380&height=214)
Mumbai Shocker: परळ ब्रिज परिसरात बसमधून प्रवास करत असताना अश्लील व्हिडीओ (Obscene Video) दाखवून एका सात वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विनयभंग आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, 55 वर्षीय आरोपी प्रवाशाला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला पॉक्सो न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वडाळ्यातील अँटॉप हिल परिसरात राहते. तिला सात वर्षांची मुलगी आहे. गुरुवारी 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता ती आपल्या मुलीसोबत बसमधून प्रवास करत होती. आरोपीही त्याच बसमध्ये प्रवास करत होता. बस परळमधील डॉ.बी.ए रोड, परळ ब्रिजवरून जात असताना आरोपीने तरुणीला त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवला. त्यानंतर त्याने तिचा हात धरून तिला व्हिडिओ पाहण्यास भाग पाडले. मध्येच हा प्रकार तिच्या आईच्या लक्षात आल्याने तिने इतर प्रवाशांच्या मदतीने आरोपीला पकडले आणि पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेनंतर तक्रारदार महिला आपल्या मुलीसह भोईवाडा पोलीस ठाण्यात आली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी प्रवाशाविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलमांखाली विनयभंगासह गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी वडाळा येथे राहत असून एका खासगी कंपनीत काम करतो. आरोपी कामावरून घरी जात असताना ही घटना घडली आहे.
दरम्यान, यावेळी त्याने मुलीला पाहून मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा विनयभंग केला. त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केल्याचे तपासात समोर आले असून हा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. बस प्रवासादरम्यान एका सात वर्षांच्या मुलीचा अश्लील व्हिडीओ दाखवण्यात आल्यानंतर इतर प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली होती.