बीड: परंपरा मोडीत काढीत 4 सुनांनी दिला सासूच्या पार्थिवाला खांदा
Beed Cremation (Photo Credits: YouTube)

सध्याच्या कलयुगात सासू-सुनांचे वाद खूप ऐकायला मिळतात. सासू-सुना एकाच घरात गुण्या-गोविंदाने राहतायत असं ऐकायला फारसं मिळत नाही. मात्र या सर्व गोष्टींना बगल देत परंपरा मोडीत काढीत बीडमधील 4 सुनांनी आपल्या सासूच्या (Mother in Law) पार्थिवाला खांदा दिल्याचे घटना पाहायला मिळाली. आपल्या सासूसोबत असलेल्या माय-लेकीचे नातं जपत, परंपरा-रूढींना बगल देत बीडमधील नाईकवाडे कुटूंबातील या 4 सुनांनी (Daughter In Laws) आपल्या सासूला खांदा दिल्याचे पाहून संपूर्ण गावासह महाराष्ट्राभर या सुनांचे कौतुक केले जात आहे.

न्यूज 18 लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, बीडमधील काशिनाथ नगरमध्ये 83 वर्षीय सुंदरबाई दगडू नाईकवाडे यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. यांना चार सुना आहेत. आपल्या सासूने आपल्याला अगदी आपल्या पोटच्या मुलींसारखे जपले, आपला सांभाळ केला. त्यामुळे त्यांच्याबद्दल असलेल्या प्रेमापोटी या 4 सुनांनी आपल्या सासूच्या पार्थिवाला खांदा दिला. हे पाहून येथील गावक-यांना आश्चर्याचा धक्काच बसला. जिथे महिलांना स्मशानभूमीत जाण्याची परवानगी मिळत नाही अशा ठिकाणी महिलांनी पार्थिवाला खांदा देण्याची ही पहिलीच घटना आहे. हेही वाचा-

सासू चावली सुनेला, धक्कादायक प्रकारानंतर परिसरात खळबळ

चोघींनी प्रेमापोटी प्रथेला आणि परंपरेला फाटा देत अंत्ययात्रेत पार्थिवाला खांदा दिला. परंपरेला मोडीत काढून स्त्रीला सुख दुःखामध्ये समान अधिकार असावेत असा उत्तम संदेश या निमिताने समाजापुढे ठेवला आहे. सुशिक्षित असलेल्या नाईकवाडे कुटुंबानी दुःखामध्ये पण सामाजिक संदेश दिला. लता नवनाथ नाईकवाडे, उषा राधाकिसन नाईकवाडे, मनीषा जालिंदर नाईकवाडे आणि मीना मच्छिंद्र नाईकवाडे अशी 4 सुनांची नावं आहे.

त्या अचानक निघून गेल्याने संपूर्ण कुटूंबाला धक्का बसला आहे. त्यांचं आमच्यावर खुप प्रेम होतं. म्हणून आम्ही चौघींनी ठरवलं की मूलं म्हणून आमचे पती खांदा देतील पण त्यांचं आमच्यावरही तेवढंच प्रेम होते. म्हणून आम्ही चोघीदेखील खांदा देणार. या निर्णयात कुटुंबीयांनीही संमती दाखवली.' असं लता नाईकवाडे म्हणाल्या.