प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

नागपूरमध्ये चार बस कंडक्टरनी एका अल्पवयीन मुलीवर सात महिने सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपण गर्भवती असल्याची शंका आल्याने ही मुलगी घर सोडून निघून गेली होती, त्यानंतर कुटुंबाने याबाबत पोलिसांमध्ये तक्रार केली असता रायपुर येथून या मुलीला ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान तिने अशा प्रकारचा अत्याचार झाला असल्याची माहिती दिली.  या प्रकरणामुळे नागपुरात संतापाची लाट पसरली असून, या चारही कंडक्टरना ताबडतोब निलंबित करण्यात आले आहे. या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. उमेश ऊर्फ वर्षपाल रामेश्‍वर मेश्राम (वय 22, रा. पारडी, इटगाव, ता. पारशिवनी), धर्मपाल दादाराव मेश्राम (वय 22, रा. पारडी, ता. पारशिवनी), आशीष काशिनाथ लोखंडे (वय 25, ॲलेक्‍सिस हॉस्पिटलजवळ, पूजा रेसिडेन्सी) आणि शैलेश ईश्‍वर वंजारी (वय 32, रा. मेहंदी, पारशिवनी) अशी आरोपींची नाव आहेत.

16 वर्षीय ही मुलगी इयत्ता अकरावीत शिकत आहे, ती कॉलेजला ये जा करण्यासाठी पालिकेच्या ‘स्टार बस’चा वापर करत असे. दरम्यान तिची ओळख धर्मपाल मेश्रामशी झाली. हळू हळू त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिला आशिष लोखंडे याच्या फ्लॅटवर नेऊन तिथे बलात्कार केला. नंतर शैलेश वंजारीने (धर्मपालचा मित्र) काही कारणास्तव तिला आशिषच्या फ्लॅटवर बोलावले, तिथे त्याने धर्मपालला बोलावून घेतले आणि या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आशिष आणि उमेशदेखील या कृत्यात सहभागी झाले. मुलीला धमकी देत हे कृत्य तब्बल सात महिने चालू होते. (हेही वाचा: आधी खोलीत, नंतर धावत्या रिक्षात 42 वर्षांच्या महिलेवर सामुहिक बलात्कार)

काही महिन्यांनी मुलीला आपण गर्भवती असल्याची शंका आली, व मुलीने घर सोडले. याबाबत तिच्या कुटुंबाने यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु करून रायपुर इथून या मुलीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान शेवटी तिने या घडलेल्या प्रकारची माहिती दिली. यशोधरानगर पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा आणि बाल अत्याचार संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. स्टार बसचे संचालन महापालिका करते, या घटनेला परिवहन समितीने गांभीर्याने घेऊन आरोपी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून हटविले आहे.