मातोश्री बंगला ,Image For Representation (Photo Credits-ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे देशात संकटाची परिस्थिती ओढवली आहे. कोरोना विषाणूद्वारे देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य म्हणजे महाराष्ट्र (Maharashtra). महाराष्ट्रात आतापर्यंत 11.5 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात शनिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या, मातोश्री (Matoshree)  येथे तैनात 3 पोलिस हवालदारांचीही कोरोना विषाणू चाचणी सकारात्मक आल्याचे समजत आहे. या तीनही कॉन्स्टेबल्सना सांताक्रूझमध्ये वेगळे ठेवण्यात आले आहे. याआधी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावरील पोलिसांनाही कोरोनाचे लागण झाल्याचे उघडकीस आले होते.

याआधी उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर चहाचा स्टॉल लावणाऱ्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली होती. मातोश्रीमध्ये तैनात असलेले बहुतेक पोलिस तेथूनच चहा प्यायचे. त्यानंतर मातोश्रीमध्ये तैनात सर्व 130 पोलिसांना वेगळे ठेवण्यात आले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मातोश्रीच्या आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला असून, संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. याआधी 22 एप्रिल रोजी, वर्षा बंगल्यावरील एका महिला कॉन्स्टेबलची कोरोना विषाणू चाचणी सकारात्मक आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईच्या बांद्रा येथील त्यांच्या खासगी निवासस्थानी राहत असल्याने, त्यांचे दक्षिण मुंबईतील शासकीय निवास्थान 'वर्षा' बंगला सध्या रिकामाच आहे. (हेही वाचा: Coronavirus at Varsha: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वर्षा' बंगल्यावरील पोलिस कॉन्स्टेबलला कोरोना विषाणूची लागण)

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 35,365 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा आकडा 11,506 वर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना मोफत आरोग्य विमा योजना देण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. आपल्या सर्व नागरिकांना मोफत कॅशलेस विमा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य बनले आहे.