Drowning (PC - Pixabay)

Nashik Rain: नाशिक शहारात गेल्या दोन दिवसापासून कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस (Nashik Rain)सुरू आहे. त्यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याच्या घटना आता समोर येत आहेत. प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या रामकुंडात (Ramkund) एक तरूण वाहून गेल्याची घटना घडली आहे. 29 वर्षीय तरुण रामकुंडात वाहून गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आई समोरच ही घटना घडली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसऱ्या घटनेत तीन वर्षीय चिमुकली सुदैवाने बचावली आहे. (हेही वाचा:Nashik Rain: नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात शिरलं पाणी; गंगापूरमधूनही विसर्ग वाढवला (Watch Video))

नाशिक शहरासह जिल्हाभरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी, गोदावरी नदीपात्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुपारी 12 वाजता धरणातून 500 क्युसेकने विसर्ग करण्यात आला. दुपारी 3 वाजता 1 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर कायम असल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते येथे भाम धरणातून शनिवारी सोडलेल्या अतिरिक्त विसर्गामुळे पाणी घरांमध्ये शिरले होते. त्यानंतर प्रशासनाने पाच ते सहा कुटुंबे व अंदाजे 20 ते 22 लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. तर, मौजे कानडवाडीत येथे भीमा पडवळे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.