COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत (Dharavi) कोरोनाचे जाळे मोठ्या वेगाने पसरत चालले आहे. शनिवारी दिवसभरात 21 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 241 वर पोहोचली आहे. तर कोरोनाबळींची संख्या 14 वर पोहोचली आहे. प्रशासनाकडून यापूर्वीच धारावी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. येथील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. मात्र, तरीही धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येथील मुस्लिम नगर आणि मुकूंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. लवकरच धारावी परिसरातील नागरिकांच्या रॅपिड टेस्ट केल्या जाणार आहेत. मात्र, त्यासाठी लागणारी किटस् उपलब्ध न झाल्यामुळे अजूनही या टेस्टला सुरुवात झालेली नाही.

धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच धारावी परिसर अधिक मोठा असल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. येथील लोक घराबाहेर पडू नये, म्हणून या परिसरातील नागरिकांना दररोज सकाळी आणि रात्री प्रत्येकी जेवणाच्या पाकिटांचे वितरण, विविध धान्य आणि आवश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या पाकिटांचे वाटप तसेच गरजवंतांना औषधांचाही पुरवठा करण्यात येत आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत 24 हजार 506 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे 775 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 5 हजार 06 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधीतांची संख्या 6 हजार 817 वर पोहचली आहे. त्यांपैकी 301 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 840 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखीला वाचा- धक्कादायक! लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने यवतमाळ येथील तरुणाची गळफास लावून आत्महत्या

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.