तारापूर (Tarapur) येथील औद्योगिक क्षेत्रात सामूहिक सांडपाणी प्रकिया केंद्रात पाण्याच्या प्रदूषणामुळे तेथील परिसरात भटकणा-या 20 कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येथील अधिका-यांनी संबंधित विभागाला कुठलीही खबर न देताच श्वानांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याचे सांगण्यात येत आहे. तारापूर येथील औद्योगिक वसाहतीत घडलेली ही घटना खूपच दुर्दैवी असून येथील व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे हा सर्व धक्कादायक प्रकार घडला असा आरोप केला जात आहे.
तारापूर येथील औद्योगिक क्षेत्रात रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया सुरु असते. याच ठिकाणी शनिवारी सकाळच्या सुमारास 25 ते 30 कुत्रे भटकत होते. त्यावेळी अचानक यातील 20 कुत्रे जमिनीवर तडफडून मेले. मात्र येथील व्यवस्थापनाने न केवळ दुर्लक्ष केले तर या कुत्र्यांच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. बोईसर: तारापूर एमआयडीसी येथील कारखान्यात भीषण स्फोट; 8 कामगारांचा मृत्यू
या भागात मोठय़ा प्रमाणात रासायनिक सांडपाणी असल्याने त्यांची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मृत्यू झालेल्या श्वानांचे शवविच्छेदन करणे गरजेचे असतानाही येथील व्यवस्थापनाने चक्क मोकळ्या जागेत जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून मृतदेहाची विल्हेवाट लावली. या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्राणीमित्रांकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे
तीन दिवस उलटले असतानाही कोणत्याही विभागाने याबाबत चौकशी देखील केली नसल्याचे प्राणिमित्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही प्राणिमित्रांकडून करण्यात येत आहे.