Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाने सर्वत्र थैमान घातलेले असताना एक आनंदाची आणि दिलासादायक माहिती समोर येत आहे. जालना मधील 107 वर्षांच्या महिलेने आणि त्यांच्या 78 वर्षांच्या मुलीने कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. कोरोना संसर्गामुळे वृद्धांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असताना या महिलांची कोरोनामुक्त होऊन कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकले आहे. मायलेकींच्या या जोडीसह कुटुंबातील अजून 3 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पीटीआय (PTI) वृत्तसंस्थने याबद्दल माहिती दिली आहे. (सुमती नार्वेकर, महाराष्ट्रातील 92 वर्षीय रूग्णाची कोरोनावर मात; असा होता पालिका ते Neon Hospital मधील 10 दिवसांचा संघर्ष)

या महिलेचा 65 वर्षीय मुलगा आणि 27 आणि 17 वर्षांची दोन नातवंडं यांच्यावर देखील आठवडापेक्षा अधिक कालावधीपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते, अशी माहिती जिल्हा सिव्हिल सर्जन अर्चना भोसले यांनी दिली आहे. हे कुटुंब जुन्या जालन्यातील मालीपुरा येथे स्थायिक आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने 11 ऑगस्ट रोजी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

PTI Tweet:

107 वर्षांच्या वृद्ध महिलेची काही दिवसांपूर्वीच पाठकण्याची सर्जरी झाली आहे. वय अधिक असल्यामुळे कोरोनामुक्त होण्याच्या प्रक्रीया आव्हानात्मक होती, असे डॉ. भोसले यांनी सांगितले. मात्र कोरोनामुक्त झाल्यानंतर या संपूर्ण कुटुंबाला हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांकडून अगदी आनंदात निरोप देण्यात आला. निरोप कार्यक्रमास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक एस चैतन्य उपस्थित होते. त्यांनी रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.