Private Bus Representative Image (Photo Credits: pxhere)

महाराष्ट्र अनलॉक 5 (Unlock 5) च्या टप्प्यात हळूहळू एक एक सुविधा सुरु होत आहेत. यात 50% क्षमतेने सुरु असलेल्या सरकारी बसेस आता 100% क्षमतेने चालविण्यास परवानगी मिळाली होती. मात्र खासगी वाहनांना (Private Bus) 50% परवानगी होती. मात्र आता सरकारी प्रवासी (Government Bus) वाहनांपाठोपाठ खासगी प्रवासी बस वाहतूकीला देखील 100% क्षमतेने संमती मिळाली आहे. लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणं हे खासगी वाहतुकीसाठी सक्तीचं असणार आहे. त्यासोबत कंत्राटी बस वाहनांमधून देखील 100% क्षमतेने वाहतुकीस परवानगी मिळाली आहे.

यासोबतच खासगी बस वाहतूकीसाठी काही महत्त्वाचे नियम घालण्यात आले आहेत. विशेष सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन होणे गरजेचे आहे.

खासगी बस वाहतूकीसाठी महत्त्वाचे नियम:

1. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गन द्वारे तपासणी करण्यात यावी. एखाद्या व्यक्तीस ताप, सर्दी-खोकला इत्यादी कोविडची लक्षणं दिसत असल्यास त्या प्रवाशास बसमधून प्रवास करण्यास प्रतिबंध करावा.

2. चालकाने प्रवासादरम्यान जेवण, अल्पोपहार, प्रसाधन गृहाचा वापर यासाठी बस थांबवल्यास त्या थांब्यावरीरल ही सर्व ठिकाणे स्वच्छ असल्याची खातरजमा करावी

3. बसचे आरक्षण कक्ष/कार्यालय, चौकशी कक्ष यांचीही वेळोवेळी स्वच्छता करावी. तसंच या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणं, सॅनेटायझर वापरणं आवश्यक, बस उभ्या राहतात त्या ठिकाणी गर्दी न होऊ देण्याची काळजी घेणं आवश्यक

4. बससमध्ये चढताना आणि उतरताना तसेच खानपान व प्रसाधनगृहाच्या वापरासाठी उतरताना प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक

5. प्रवाशांनी बसमध्ये कोणताही कचरा फेकू नये, कचरा फेकण्यासाठी कचराकुंडीचाच वापर करावा.

थोडक्यात खासगी बस वाहतुकीसाठी बस मालकाला तसेच प्रवाशांना घालण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. यावर प्रशासनाची करडी नजर असणार आहे.