फोटो सौजन्य - फेसबुक

Matheran Toy Train Resume: प्रवाशांसाठी खुशखबर! नेरळ-माथेरान टॉय ट्रेनची सेवा पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू; जाणून घ्या वेळापत्र व तिकीट दरपावसाळ्यात विश्रांती घेतल्यानंतर मध्य रेल्वेने नेरळ ते माथेरानला जोडणारी आयकॉनिक टॉय ट्रेनची (Toy Train) सेवा पुन्हा सुरू केली आहे. यामुळे प्रसिद्ध माथेरान या हिल स्टेशनकडे जाणारे पर्यटक आनंदी आहेत. साधारण 150 वर्ष जुन्या मिनी ट्रेनमध्ये बसण्यासाठी लहान मुले खूपच आतुर होती. हिरवीगार झाडे, पर्वत आणि दऱ्या पार करून नेरळहून माथेरानला जाण्यासाठी ट्रेनला 2 तास 30 मिनिटे लागतात. निसर्गसौंदर्यामधील हा संथ प्रवास हे टॉय ट्रेनचे वैशिष्ट्य आहे. कालपासून म्हणजेच, 6 नोव्हेंबरपासून ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. आता सेवा पुन्हा सुरू केल्यानंतर मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान टॉय ट्रेनच्या पहिल्या प्रवासाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

ही ट्रेन एकूण 20 किलोमीटर अंतर कापते. सध्या ही ट्रेन दोन्ही दिशांना दिवसातून दोनदा चालेल. यासह पावसाळ्यात चालणारी माथेरान-अमन लॉज शटल सेवा, आठवड्याच्या शेवटी (शनिवार आणि रविवार) अतिरिक्त सेवांसह अनेक दैनंदिन सेवांसह कार्यान्वित होईल. (हेही वाचा: Best Tourism Villages Competition-2024: केंद्र सरकारकडून देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गावांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील कर्दे गावाचा समावेश)

नेरळ-माथेरान टॉय ट्रेनची सेवा पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू-

वेळापत्रक-

नेरळ ते माथेरान डाऊन गाड्या सकाळी 8.50 आणि 10.25 वाजता सुटतील आणि माथेरानला सकाळी 11.30 आणि दुपारी 1.05 वाजता पोहोचतील. माथेरान ते नेरळ परतीच्या गाड्या दुपारी 2.45 आणि 4 वाजता सुटतील आणि नेरळमध्ये 5.30 आणि 6.40 वाजता पोहोचतील. प्रत्येक ट्रेनमध्ये सहा डबे असतील, ज्यामध्ये तीन द्वितीय श्रेणीचे डबे, एक प्रथम श्रेणीचा डबा आणि दोन द्वितीय श्रेणी-सह-लगेज व्हॅनचा समावेश असेल.

तिकीट दर-

नेरळ-माथेरान ट्रेनसाठी तिकीट नेरळ आणि अमन लॉज येथील तिकीट काउंटरवरून खरेदी केले जाऊ शकते, नेरळ येथील काउंटर ट्रेन सुटण्याच्या 45 मिनिटे आधी उघडेल. नेरळ-माथेरान मार्गासाठी प्रथम श्रेणीसाठी 340 रुपये आणि द्वितीय श्रेणीसाठी 95 रुपये तिकीट दर आहेत.

यासह अमन लॉज-माथेरान शटलसाठी, द्वितीय श्रेणीसाठी 55 रुपये आणि प्रथम श्रेणीसाठी 95 रुपये तिकीट आहे. सर्व शटल सेवा (अमन लॉज - माथेरान - अमन लॉज) तीन द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी कोच आणि दोन द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह चालतील.