मार्गशीर्ष हा हिंदू धर्मीयांमधील पवित्र महिन्यांमधील एक आहे. 19 डिसेंबर पर्यंत यंदा हा मार्गशीर्ष महिना असून या महिन्यात दर गुरूवारी महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. दरम्यान आज (8 डिसेंबर) मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती आहे. या पवित्र पर्वाचं औचित्य साधत देशाभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंढरपूरच्या विठ्ठल- रूक्मिणी मंदिरातही आज या एकादशीचं औचित्य साधत खास आकर्षक फुलांची सजावट केली आहे. गुलाबी रंगाच्या जरबेरा फुलांच्या सजावटीने (Gerbera Flower Decoration) संपूर्ण मंदिर आकर्षक आणि मंगलमय झाले आहे.
जरबेरा फुलं आणि हिरवी पानं यांची सजावट मंदिरातील गाभार्यासोबतच विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तिवरही करण्यात आली आहे. आज सोशल मीडियामध्ये विठूराया आणि रखुमाईचं विलोभनीय रूप आणि त्याच्यासोबत फूलांच्या आकर्षक सजावटीने मंगलमय झालेलं मंदिर याचे फोटो सोशल मीडीयामध्ये व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी उबदार कपड्यांमधील विठ्ठल-रूक्मिणीचं रूप देखील इतकेच विलोभनीय दिसत होतं.
जरबेरा फुलांच्या आकर्षक सजावटीमध्ये खुलेलं विठ्ठल रखुमाईचं रूपडं
गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
मोक्षदा एकादशीला पितरांना मोक्ष देणारी एकादशी, असे म्हटले जाते. जो व्यक्ती हे व्रत करील त्याच्या पितरांसाठी मोक्षाचे दरवाजे उघडले जातील. अशी भाविकांची धारणा आहे. तर महाभारत युद्ध सुरू असताना अर्जुन मोहग्रस्त झाला होता. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश देऊन अर्जुनला त्या मोहातून बाहेर काढले होते. त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची शुक्ल पक्षाची एकादशी होती. त्यामुळे मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हीच गीता जयंती म्हणून देखील ओळखली जाते.